Sangli Samachar

The Janshakti News

एका चार्जमध्ये 200 किलोमीटर धावणारी देशातील पहिली इलेक्ट्रिक हवाई टॅक्सी; खुद्द आनंद महिंद्रा यांनी दाखवली झलक



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १३ मे २०२४
आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आहेत. आनंद महिंद्रा हे त्यांच्या विविध मुद्द्यांवरील मनोरंजक ट्विटसाठी ओळखले जातात. आनंद महिंद्रा ट्विटच्या माध्यमातून कधी कुणाला मदत करताना, खेळाडूंना प्रोत्साहन देताना तर कधी ट्रोलर्ल्सना चोख प्रत्युत्तर देताना दिसतात. आता अलीकडेच आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत देशातील पहिल्या एअर टॅक्सीचे फोटो शेअर केले आहेत. त्यांनी हवाई टॅक्सीला वाहतुकीच्या जगातील एक नवीन शोध असल्याचे सांगितले आहे आणि अशा नावीन्यपूर्ण शोधाला प्रोत्साहन दिल्याबद्दल आयआयटी मद्रासचेही त्यांनी कौतुक केले आहे.

भविष्यातील वाहतुकीचे साधन

आनंद महिंद्रा यांनी एअर टॅक्सी हे भविष्यातील वाहतुकीचे साधन असे वर्णन केले आहे. भारतातील पहिल्या एअर टॅक्सीची फोटो आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना त्यांनी आयआयटी मद्रासचेही कौतुक केले आहे. पुढील वर्षी एअर टॅक्सीने प्रवास करण्याची सुविधा देशात उपलब्ध होईल, अशी आशाही आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केली आहे. ट्विटरवर पोस्ट करत ते म्हणाले की ईप्लेन कंपनी आयआयटी मद्रासच्या सहकार्याने एअर टॅक्सी विकसित करत आहे.


एअर टॅक्सीमध्ये काय असेल खास?

ही एअर टॅक्सी चेन्नईस्थित स्टार्टअप कंपनी इप्लेनद्वारा विकसित केली जात आहे. गेल्या वर्षीच या कंपनीला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (DGCA) इलेक्ट्रिक विमाने तयार करण्याची परवानगी मिळाली होती. ईप्लेनने आपल्या एअर टॅक्सीला E200 असे नाव दिले आहे. एका चार्जवर ही टॅक्सी अनेक वेळा उडू शकते. या एअर टॅक्सीची रेंज एका चार्जवर 200 किलोमीटर इतकी आहे. यात दोन जण प्रवास करू शकतात. एखाद्या हेलिकॉप्टरप्रमाणे ही टॅक्सी थेट हवेत उडते आणि आपला प्रवास सुरू करते. 5 बाय 5 मीटर क्षेत्रफळ असलेली ही टॅक्सी बजेटमधील किमतीत बाजारात दाखल होणार आहे.

एअर टॅक्सीला सरकारची परवानगी

दरम्यान, सरकारने देशातील काही मार्गांवर एअर टॅक्सी चालण्याची परवानगी दिली आहे. ही योजना देशात प्रथमच एनसीआरमध्ये सुरू करण्यात येणार असून, याच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. सर्वेक्षणात सहा मार्गांवर एअर टॅक्सी चालवण्याची योजना आखली आहे. यासाठी एनसीआरमध्ये 48 ठिकाणी हेलीपोर्ट बांधण्यात येणार आहेत. नागरी उड्डाण मंत्रालय, गृह मंत्रालय, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय, भारतीय विमानतळ प्राधिकरण, डिजिटल स्काय यांचा संयुक्त प्रयत्नातून पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेलवर आधारित एअर टॅक्सी चालवण्याची योजना आहे.