Sangli Samachar

The Janshakti News

PM मोदींच्या कामावर जनता समाधानी; CM शिंदेंबद्दल मत काय?



सांगली समाचार - दि ५ एप्रिल २०२४
मुंबई  - लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यापासून सर्वच राजकीय पक्ष प्रचाराला लागले आहेत. कुठल्या पक्षाची छाप मतदारांवर पडते, कोण नेता जनतेला आश्वासित करतो याबाबतही लोक मत बनवू लागलेत. अशातच नुकत्याच जाहीर झालेल्या सर्व्हेतून महाराष्ट्रात आश्चर्यचकित निर्णय लागणार असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातील बहुतांश जनता केंद्रातील सत्ताधारी भाजपा सरकारच्या कामावर नाखुश आहे. परंतु पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीच यांना जनतेने पहिली पसंती दिली आहे.

महाराष्ट्रातील जनतेला विचारण्यात आलं की, ते केंद्र सरकारच्या कामावर किती समाधानी आहेत त्यात ३५ टक्के लोकांनी स्पष्टपणे असमाधानी असल्याचं म्हटलं तर ३० टक्के लोकांनी केंद्राच्या कामावर समाधान व्यक्त केले. ४ टक्के लोकांनी आम्हाला काही माहिती नसल्याचं सांगितले. या प्रश्नातून केवळ ३० टक्केच जनता केंद्र सरकारच्या कामावर खुश असल्याचं दिसून येते. ABP-C Voter यांनी हा सर्व्हे केला आहे.


नरेंद्र मोदीच पंतप्रधानपदासाठी पहिली पसंती

पंतप्रधान म्हणून कुणाला पाहू इच्छिता असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला केला तेव्हा बहुतांश लोकांनी नरेंद्र मोदी हीच पहिली पसंती असल्याचं सांगितले. या प्रश्नासाठी लोकांना ४ पर्याय दिले होते. त्यात नरेंद्र मोदी, राहुल गांधी, दोघेही नाही किंवा अन्य असा पर्याय दिला होता. त्यात ६१ टक्के लोकांनी पंतप्रधान म्हणून मोदींनाच पसंती दिली. तर २९ टक्के लोकांनी राहुल गांधींना पर्याय म्हणून स्वीकारलं. ६ टक्के लोकांनी हे दोघेही नको तर ४ टक्के लोकांनी अन्य असं उत्तर दिलं.

मोदींची कार्यशैली ४३ टक्के लोकांना पसंत

महाराष्ट्रातील जनता भलेही केंद्र सरकारच्या कामकाजावर समाधानी नसेल परंतु पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर ते समाधानी आहेत. पंतप्रधानांच्या कार्यशैलीवर प्रश्न विचारताच ४३ टक्के जनतेने ते खूप समाधानी असल्याचं म्हटलं. तर २७ टक्के लोकांनी कमी समाधानी , २८ टक्के लोकांनी असमाधानी तर २ टक्के लोकांनी उत्तर देण्यास नकार दिला.

एकनाथ शिंदेंच्या कामावर ३० टक्के जनता खुश

महाराष्ट्रातील ३५ टक्के लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या कामकाजावर असमाधान व्यक्त केलं. २८ टक्के असे लोक आहेत जे काहीसे समाधानी आहे तर ३० टक्के लोकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कामावर समाधानी आहेत. ७ टक्के लोकांनी काहीही उत्तर दिले नाही. मतदानाच्या टक्केवारीचं बोलाल तर एनडीए आणि विरोधी इंडिया आघाडीला ४१ टक्के मतं मिळू शकतात. तर १८ टक्के मतदान इतरांच्या खात्यात जाण्याची शक्यता आहे. मार्च महिन्याशी तुलना करता NDA आघाडीच्या मतांच्या टक्केवारीत २ टक्के घट होताना दिसते. तर INDIA आघाडीच्या मतांची टक्केवारीही १ टक्क्यांनी घसरली आहे. इतरांच्या मतांच्या टक्केवारीत ३ टक्के वाढ झाली आहे.