Sangli Samachar

The Janshakti News

मिशीवाल्या' प्राचीची दुर्दैवी कहाणी. दहावीत टॉपर ठरूनही लोकांनी केलं ट्रोल !| सांगली समाचार वृत्त |
लखनौ - दि.२४ एप्रिल २०२४
''अरेच्या, हिला तर इतक्या मोठमोठ्या मिश्या आहेत… ही पोरगी कशी काय असू शकते? दिसायला तर एकदम मुलासारखी आहे… युपी दहावी बोर्डात टॉपर ठरली तर काय झालं, चेहरा तर पोरासारखाच आहे ना''
"तू हुशार आहेस पण तुझ्या चेहऱ्यावर किती केस आहेत? तू जरा स्वतःच्या दिसण्याकडे पण लक्ष द्यायला हवं, "

अशा कितीतरी हिणकस कॉमेट्सने युपीच्या दहावी बोर्डात अव्वल ठरलेल्या प्राची निगम नावाची एक मुलगी ट्रोलर्सची शिकार ठरली.

यूपी बोर्डाच्या दहावीचा 20 एप्रिल रोजी निकाल जाहीर झाला. एकीकडे घवघवीत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव केला जात होता तर त्याचवेळी दुसरीकडे तिच्या हुशारीकडे दुर्लक्ष करून चेहऱ्यावरून तिला प्रश्न विचारले जात होते. यूपी बोर्डाच्या दहावीत उत्तर प्रदेशची प्राची निगम टॉपर ठरली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर प्राचीचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. यामध्ये तिच्या चेहऱ्यावर मिशी असल्याचं आढळलं आणि यामुळे तिला जोरदार ट्रोल केलं गेलं. प्राचीने 98.50 टक्के म्हणजे 600 गुणांपैकी तब्बल 591 गुण पटकावून आपल्या माता-पित्यांचे स्वप्न पूर्ण केले. साहजिकच तिच्या या यशाने मित्र- मैत्रिणी, कुटुंब, नातेवाईकांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. एकीकडे निगम कुटुंब हा आनंद साजरा करत असताना त्यांच्या आनंदावर विरजण घालण्यासाठी काही विघ्नसंतोषी लोकांनी प्राचीला ट्रोल करायला सुरुवात केली. कारण काय तर तिच्या चेहऱ्यावरचे केस! मुलींच्या चेहऱ्यावर एवढ्या प्रमाणात केस का येतात? चेहऱ्यावरच्या केसांमागे काय आरोग्यदायी समस्या असतात, हे समजून न घेता प्राचीला ट्रोल केलं.


प्राची निगम ही विद्यार्थिनी सीतापूर येथील सीता बाल विद्या मंदिर इंटर कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर प्राचीने सांगितलं की "मला कधीच वाटलं नव्हतं की मी टॉपर होईन. मी अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं पण टॉपर होईन अशी अपेक्षा नव्हती. मला माझ्या मेहनतीचा अभिमान आहे. तिला इंजिनिअर बनण्याची इच्छा आहे. आता ती IIT-JEE प्रवेश परीक्षा देण्याची तयारी करत आहे. तिने तिच्या यशाचे श्रेय सातत्यपूर्ण प्रयत्नांना आणि नियमित सरावाला दिले आहे. आपल्याप्रमाणे यश संपादित करण्यासाठी इतरांनाही प्रेरणा देत असतानाचा हा व्हिडीओ आपल्यावरच असा उलटून पडेल याचा कदाचित प्राचीने विचारही केला नसावा. कारण हा व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी ना तिची कहाणी ऐकली ना तिची मेहनत वाखाणली, त्यांनी फक्त पाहिले तिच्या चेहऱ्यावरचे केस!

प्राची निगमला तिच्या मिशांमुळे ट्रोल केल्याचे पाहून अनेकांनी प्राचीच्या बाजूने या ट्रोलर्सचा खरपुस समाचारही घेतला आहे. जगज्जेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने प्राचीची पाठराखण करताना एक्स वर लिहिलं की, प्राची तु अजिबात घाबरू नकोस किंवा टेन्शन घेऊ नकोस, तु तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर आणि मजेत रहा… डेहराडूनचे एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने प्राचीच्या या आजाराच्या उपचारासाठी लागणारा पूर्ण वैद्यकीय खर्च उचलण्याची घोषणा केली आहे. तर काहींनी तुमच्या या अशा विचारांमुळे एका हुशार मुलीला काय वाटत असेल तिच्या मनावर काय परिणाम होत असेल याचा विचार केलायत का? पौगंडावस्थेत अनेकदा हार्मोन्स अनियंत्रित होतात, पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) सारख्या समस्या तर तरुण मुलींमध्ये अत्यंत सामान्य आहेत, यामुळे अशाप्रकारे चेहऱ्यावर केस येऊ शकतात. प्राचीच्या बाबतही असं असू शकतं, पण अगदी हे कारण नसलं तरी तिच्या हुशारी पलीकडे जाऊन चेहरा बघणारे किती सुज्ञ आहेत? असे प्रश्न अनेकांनी या ट्रोलर्सला केले आहेत.

पीसीओएसच्या समस्येने हैराण

युपी टॉपर प्राचीला पीसीओएस म्हणजे पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम नावाचा त्रास आहे. या आजारामुळे मेटाबॉलिक आणि हार्मोन्समध्ये मोठ्या प्रमाणात बदल होतो. अनेक मुलींना खूप दिवस मासिक पाळी येत नाही किंवा ज्यांच्या मासिक पाळीची सायकल मोठी असते त्यांच्यामध्ये पीसीओएसची समस्या जाणववते. महत्त्वाचं म्हणजे ही समस्या अगदी मेनोपॉझपर्यंत देखील राहते. पीसीओएस एक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे यामध्ये लाइफस्टाइलमधील बदल देखील कारणीभूत ठरतात.

‘कारण समजून घ्यायचा प्रयत्न करा’

मुलींच्या चेहऱ्यावर केस येण्याची दोन कारणं असू शकतात. एक म्हणजे आनुवांशिक कारण आणि दुसरं म्हणजे हार्मोनमध्ये होणारे बदल. हॉर्मोन्समधील संतुलन बिघाडल्यानंही चेहऱ्यावर केस येऊ शकतात.चेहऱ्यावर खूप केस असल्यास त्या स्थितीला ‘हायपर ट्रायकोसिस’ असं म्हणतात. अनुवांशिक कारणांमुळे केस उगवले असतील तर त्याला ‘जेनेटिक हायपर ट्रायकोसिस’ असं म्हणतात. पण हार्मोनच्या असंतुलनामुळे केस येत असतील तर या स्थितीला ‘हरस्युटिझ्म’ असं म्हटलं जातं. हार्मोनच्या असंतुलनाचं मुख्य कारण पीसीओडी (पॉलीसिस्टिक ओवेरियन डिस्ऑर्डर) असू शकतं आणि आजच्या काळात हे प्रमाण वेगानं वाढत आहे. असं असलं तरी प्रत्येक पीसीओडी रुग्णाच्या चेहऱ्यावर केस येतीलत असंही नाही.

पीसीओडीला सर्वांत अधिक जीवनशैली कारणीभूत असते. आपल्या खाण्याच्या सवयी, शरीर कमावण्यासाठी औषधांचा वापर, तास-न्-तास एकाच जागी बसणं, ताणतणाव यामुळे पीसीओडी बळावते. या सर्व बाबींमुळे महिलांमध्ये पुरुषांप्रमाणे एंड्रोजन आणि टेस्टेस्टेरॉन हार्मोन वाढतात.