Sangli Samachar

The Janshakti News

गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे कोणता बॉंब टाकणार ?



सांगली समाचार - दि. ६ एप्रिल २०२४
मुंबई- लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार घोषित केले, पण मनसेने अद्याप एकही उमेदवार घोषित केला नाही. त्यामुळे मनसे निवडणूक लढवणार की नाही याबाबतची साशंकता निर्माण झालेली आहे. मात्र, या सर्वांची प्रश्न उत्तरं येत्या 9 एप्रिल रोजी मिळणार आहेत. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांची तोफ धडाडणार असून सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील.
 
मध्यंतरी राज ठाकरे दिल्लीत जाऊन भाजप नेते अमित शाह यांना भेटले. त्यांच्याशी चर्चा झाली. नंतर मुंबईत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी राज यांची चर्चा झाली. त्यानंतर राज ठाकरे पुन्हा राजकीय चर्चांमध्ये दिसले नाहीत. त्यामुळे राज ठाकरे यांच्याबद्दलचा सस्पेन्स वाढलेला असतानाच मनसेचा गुढी पाडव्याचा टीझर लॉन्च झाला आहे. त्यातून एक सूचक विधान करण्यात आलं. 


मनसेने गुढी पाडवा मेळाव्याचा टीझर लॉन्च केला आहे. तसेच गुढी पाडवा मेळाव्याच्या पोस्ट्स सोशल मीडियावरही व्हायरल झाल्या आहेत. राजकारणाची झाली दशा, राजविचार दाखवणार महाराष्ट्राला दिशा, असं मनसेने लाँच केलेल्या टीझरमध्ये म्हटलं आहे. तसेच महाराष्ट्रालाच नव्हे तर राजकारणालाही नवनिर्माणाची गरज असल्याचंही त्यामध्ये म्हटलं आहे.

वक्ता एक...लक्ष-लक्ष श्रोते ! नवनिर्माणाची गुढी उभारू... येताय ना ! 9 एप्रिलला शिवतीर्थावर या, नक्की काय घडलंय, काय घडतंय हे सांगायचं आहे... अशी मनसेची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. येत्या 9 एप्रिल रोजी मराठी नववर्ष दिन म्हणजे गुढी पाडवा आहे. संध्याकाळी 4 वाजता दादरच्या शिवाजी पार्कवर मनसेने गुढी पाडवा मेळाव्याचं आयोजन केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. गुढी पाडव्याच्या मेळाव्यातून राज ठाकरे 9 तारखेला कुणावर बरसतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मनसे लोकसभा निवडणूक लढणार की नाही? याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा आहे. त्याबाबतही राज ठाकरे या मेळाव्यातून मोठी घोषणा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर मनसेचं लोकसभेबाबतचं राज्यातील चित्र स्पष्ट होईल.