सांगली समाचार - दि. ६ एप्रिल २०२४
वॉशिंग्टन - अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ऑस्टिन शहरात शिवजयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या वादनाने परिसर दुमदुमून गेला होता. महाराष्ट्रीयन पारंपरिक समृद्ध वारशाची जोपासना करण्यासाठी २०१८ मध्ये स्थापन झालेल्या 'महाराष्ट्र माझा' या स्वयंसेवी संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला होता. यासाठी चोवीस अमेरिकन-भारतीय सांस्कृतिक आणि सामाजिक संस्थांनी सक्रिय पाठिंबा दिला. या कार्यक्रमात १५० हून अधिक कलाकारांनी भाग घेतला. अमेरिका आणि टेक्सास राज्याच्या झेंड्याबरोबर छत्रपती शिवरायांचा भगवा कॅपिटॉल बिल्डिंगसमोर फडकला.
या कार्यक्रमासाठी मंच उभारण्यात आला होता आणि पालखी बनवण्यात आली होती. थ्री-डी तंत्रज्ञानाने शिवरायांचा पुतळा प्रिंट केला होता. शास्त्रीय आणि लोकनृत्येही या प्रसंगी झाली. बालकलाकारांचे ढोल-ताशा वादन लक्षवेधक ठरले. सॅन अँटोनियो महाराष्ट्र मंडळाने नावीन्यपूर्ण नृत्याने राज्याभिषेक सोहळा सादर केला. विंग स्कूल ऑफ आर्टच्या महिलांनी 'घुमर' हे पारंपरिक नृत्य सादर केले. ऑस्टिन पंजाबी कल्चरल असोसिएशनच्या महिलांनी 'भांगडा' आणि 'गिद्धा' नृत्य सादर केले. तेलगू कल्चरल असोसिएशनच्या कलाकारांनी देशभक्तीपूर्ण गाण्यावर नृत्य सादर केले. कॅपिटॉल बिल्डिंगच्या द ग्रेट वॉक वरून ढोल-ताशा लेझीमची भव्य मिरवणूक काढण्यात आली. नऊवारी घातलेल्या महिला मिरवणुकीत पालखीमागे लेझीम नृत्य सादर करत होत्या. त्यामागे ६० ढोल आणि ताशा कलाकार वादन करत होते. ढोल- ताशा, लेझीम आणि झांज यांच्या सादरीकरणाने मिरवणुकीची सांगता झाली.