Sangli Samachar

The Janshakti News

विशाल पाटलांसाठी आखण्यात आलेल्या चक्रव्युहात सापडले ते उद्धव ठाकरेच !



सांगली समाचार - दि. ६ एप्रिल २०२४
सांगली - "मोदी हटाव" या समान कार्यक्रमावर संपूर्ण देशात इंडिया आघाडीच्या माध्यमातून विरोधी पक्ष एकदिलाने एकवटला खरा. पण नंतर कोणत्या ना कोणत्या मतभेदामुळे एक एक पक्ष इंडिया आघाडी मधून बाहेर पडू लागला. (आता इंडिया आघाडीत पक्ष किती ? असा प्रश्न कोणी विचारला तर हाताची बोटेही जास्तच होतील.)

इकडे महाराष्ट्रात महाआघाडी पूर्ण ताकतीने महायुतीशी भिडेल असे वाटत असतानाच, एकेका मतदार संघात मिठाचा खडा पडताना दिसत आहे. सर्वात मोठा तिढा निर्माण झाला आहे तो सांगली व मुंबईतील दोन मतदारसंघात. सांगलीत ठाकरे गटाने तर मुंबईत शरद पवार गटाने काँग्रेसवर आगळीक केल्याने, काँग्रेस पक्ष पेटून उठला आहे. या तिन्ही मतदारसंघावर कोणत्याही परिस्थितीत आपला हक्क सोडायचा नाही असा ठाम निर्धार राज्य नेतृत्वाने घेतल्याने, महाआघाडीमध्ये बिघाडी होताना दिसत आहे.


पैकी सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला. 2014 व 2019 मध्ये मोदी लाटेत काँग्रेसला येथे फटका बसला. दोन्ही वेळेला उमेदवार होते ते पाटील घराण्यातील. त्यामुळे "इथल्या काँग्रेसचा व पाटील घराण्याचा दबदबा संपला आहे, आताही जर विशाल पाटलांना उमेदवारी दिली, तर पराभवाची हॅट्रिक काँग्रेस करेल" असा "चक्रव्यूह" महाआघाडीतील चाणक्य व करेक्ट कार्यक्रम करणाऱ्या नेतृत्वाने आखला. विशाल पाटलांची गेम करण्यासाठी पुढे केले गेले ते उद्धव ठाकरे यांना. 'आम्ही पाठबळ देऊ !' या शब्दाला ठाकरेही भुलले आणि पै. चंद्रहार पाटलांना उबाठा शिवसेनेच्या उमेदवारीचा शब्द देऊन रिकामे झाले. हा दबाव तंत्राचा भाग असू शकतो, अशी समजूत करून घेऊन काँग्रेसच्या राज्य नेतृत्वाने बघ्याची भूमिका घेतली, आणि इथेच सारे गणित फिस्कटले.

पण राज्यात बॅकफूटवर गेलेल्या काँग्रेसच्या नेतृत्वापेक्षा सांगलीतील तरुण नेत्यांनी हा "डाव" ओळखला. आणि पहिल्याच दिवसापासून आक्रमक पवित्रा घेऊन याला विरोध करण्यास सुरुवात केली. पण 'शिडात शब्दांची हवा भरलेले' ठाकरे समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी मिरजेतील जाहीर सभेमध्ये टाळ्यांच्या कडकडाटात व घोषणांच्या गदारोळात पै. चंद्रहार पाटलांच्या गळ्यात उमेदवारीचा हार घातला. 

यानंतर मात्र डॉ. विश्वजीत कदम, आ. विक्रम सावंत, पृथ्वीराज पाटील, जयश्रीताई पाटील आणि स्वतः विशाल पाटील यांनी हातात शस्त्र घेऊन हा चक्रव्यूह भेदण्यासाठी सारी शक्ती एकवटली. ही सारी मंडळी राज्य काँग्रेस नेतृत्वा पाठोपाठच केंद्रीय नेतृत्वाकडे सांगलीच्या उमेदवारी बाबत ठाण मांडून बसली. परिणामी या आक्रमक भूमिकेस राज्य नेतृत्वाने ठाम पाठिंबा दिला. केंद्रीय नेतृत्वाने "नरो वा कुंजुरो वा" म्हणून सावध पवित्र घेतला. हाच सावध पवित्रा सांगलीच्या नेतृत्वाच्या पथ्यावर पडला व त्यांनी नागपुरात असलेल्या राज्य नेतृत्वाकडे ही सारी घटना कथन केली. राज्य नेतृत्व पहिल्यापासूनच सांगलीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून होते. आणि म्हणूनच त्यांनी सांगलीच्या नेतृत्वाला "पुढे जाण्याचा" सल्ला दिला असावा. विशाल पाटील यांनीही, थेट काँग्रेसचा उल्लेख टाळत आपण लढणार असल्याचा "लेटर बॉम्ब" फोडला. 

दरम्यान सांगली दौऱ्यात राऊत यांना आलेला अनुभव ठाकरे व पडद्यामागील सूत्रधारांपर्यंत पोहोचला. परिणामी महाआघाडीतील मोठ्या साहेबांनी सांगलीच्या बाबतीत शिवसेनेने घाई केल्याचे सांगून आपले अंग काढून घेतले. (आता यामागे मुंबईतील दोन जागा पदरात पाडून घेण्याची खेळी असू शकते, असा राजकीय कयास असला तरी,) सांगलीच्या नेतृत्वाने स्वतःभोवती आखलेला चक्रव्यूह भेदण्यात यश मिळवले आणि या चक्रव्युहात अडकले ते ठाकरे.