Sangli Samachar

The Janshakti News

निवडणूक रिंगणातील प्रतिस्पर्धी आमने-सामने आले ! आणि..| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.२७ एप्रिल २०२४
निवडणूक म्हटलं की आरोप-प्रत्यारोप आलेच. सांगलीमध्येही निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या उमेदवाराकडून प्रतिस्पर्धी उमेदवारांवर पहिलवान कोण यावरून वादंग होत असताना शुक्रवारी सकाळी उबाठा शिवसेनेचे उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील व अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे प्रचारादरम्यान आमनेसामने आले. यावेळी दोघांनीही हस्तांदोलन करत निवडणुकीच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या.


निवडणूक जाहीर होण्यापूर्वी भाजपचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांनी मी जत्रा आल्यावर मेहनत करणारा पैलवान नसून कसलेला पहिलवान असल्याचे म्हटले होते. तर उमेदवारी दाखल केल्यानंतर पक्षाची कपडे काढून मैदानात या मी लढण्यास लंगोट घालून तयार आहे असे प्रतिआव्हान अपक्ष उमेदवार पाटील यांनी दिले होते. तर डबल महाराष्ट्र केसरी पहिलवान पाटील यांनी या उमेदवारांना पहिलवान म्हणणे म्हणजे पहिलवानांचाच अवमान असल्याची टीका केली होती.

या टीका टिप्पणीनंतर शुक्रवारी सकाळी प्रभात फेरीसाठी, व्यायामासाठी मैदानात, बगिच्यामध्ये जाणार्‍या मतदारांना भेटण्यासाठी विशाल पाटील व चंद्रहार पाटील बाहेर पडले होते. दोघेही सकाळी बापट मळा येथील महावीर उद्यानाजवळ आल्यानंतर एकमेकासमोर अचानक आले. दोघांनीही स्मितहास्य करत एकमेकांना निवडणुकीच्या शुभेच्छा देत आपला प्रचार सुरू ठेवला. प्रतिस्पर्धी असतानाही दोघानी एकमेकांना निवडणुकीच्या शुभेच्छा दिल्याचे पाहून पहाटे फिरण्यासाठी बाहेर पडलेले मतदारही आश्‍चर्य चकित झाले आणि खेळीमेळीतील निवडणुकीची लढाई अशाच पद्धतीने व्हायला हवी अशी अपेक्षाही व्यक्त केली.