Sangli Samachar

The Janshakti News

अरेच्चा ! आधी पोटोबा, मग... मतदान थांबवून अधिकारी, कर्मचाऱ्यांची पंगत !| सांगली समाचार वृत्त |
यवतमाळ - दि.२७ एप्रिल २०२४
यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात काल मतदान संपन्न झाले. यवतमाळ तालुक्यातील हिवरी येथे मतदान सुरू असताना केंद्राध्यक्ष, कर्मचाऱ्यांनी नाश्ता करण्यासाठी मतदान मध्येच थांबविण्याची घटना घडली. या प्रकाराने मतदार केंद्रावर मतदानासाठी गेलेल्या नागरिकांचा खोळंबा झाला.

मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. मतदान सुरू असताना त्यात कोणत्याही पद्धतीचा खोळंबा होऊ नये, याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाते. मतदान थांबवून अधिकारी, कर्मचाऱ्यांना कुठलेही इतर कार्य करता येत नाही. नाश्ता, जेवणसुद्धा मतदान न थांबवता करावे, अशा सूचना आहेत. मात्र हिवरी येथील उच्च प्राथमिक शाळा केंद्रावर खोली क्रं . ४ येथे मतदानासाठी नागरिक रांगेत उभे असताना, मतदान कक्षातील चार अधिकारी, कर्मचारी नाश्ता करण्यासाठी खाली एकत्र बसले. यामुळे दुपारी २ वाजताच्या दरम्यान हा प्रकार घडला. जवळपास २० मिनिटे मतदान प्रक्रिया बंद होती.


मतदारांनी ओरड सुरू करत, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पंगतीचे व्हिडिओ आणि फोटो समाज माध्यमांवर प्रसारित केले. मतदान केंद्रांवर तैनात सुरक्षारक्षकानेही नागरिकांशी अरेरावी करत त्यांना अडविल्याची तक्रार आहे. याप्रकरणी यवतमाळ येथील निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार योगेश देशमुख यांना विचारणा केली असता, सर्व अधिकारी कर्मचारी एकाच वेळी नाश्ता करत असताना अचानक मतदारांची गर्दी झाली. त्यावेळी होमगार्डने त्यांना काही वेळ थांबण्याच्या सूचना केल्या. नागरिकांची ओरड होताच कर्मचाऱ्यांनी मतदान प्रक्रिया सुरू केली. या केंद्रावर मतदान सुरळीत सुरू झाले, असे तहसीलदार देशमुख यांनी सांगितले. येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे.

'मशाल'समोरील बटन दाबले, पण व्हीव्हीपॅटवर 'धनुष्यबाण' अंकीत झाले…

निर्भय बनो अभियान अंतर्गत बाभुळगाव तालुक्यातील फाळेगांव येथे भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेत असताना मशाल चिन्हासमोरील बटण दाबले असता व्हीव्हीपॅट मशीनवर धनुष्यबाण हे चिन्ह अंकीत झाले, अशी तक्रार नितिन बोदे यांनी केली आहे. या संदर्भात बाभुळगाव निवडणूक निर्णय अधिकारी तथा बाभुळगाव तहसीलदार यांना तक्रार देण्यात आल्याचे बोदे यांनी सांगितले. या तक्रारीनंतर या ठिकाणी दुसरी मशिन लावण्यात आली व मतदान पुन्हा सुरु झाले. तालुक्यातील दाभा या गावी असाच प्रकार घडल्याने तेथेही काही काळ गोंधळ उडाला.

आणखी वाचा-बुलढाणा: मतदानासाठी लगबग… तब्बल साडेचार कोटींची रक्कम… यंत्रणांची धावपळ, मात्र…

यवतमाळमध्ये मतदान न करताच बोटाला शाई !

दरम्यान यवतमाळ शहरातील छोटी गुजरी परिसरात मतदारांच्या बोटावर शाई लावून त्यांना पैसे देवून मतदान होवू नये म्हणून काही व्यक्ती पैसे वाटत असताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. शिवसेना उबाठाचे संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड हे या प्रकरणी तक्रार करण्यास यवतमाळ शहर पोलिसांत पोहोचले होते. मात्र अद्याप या प्रकरणी तक्रार दाखल झाली नाही.