Sangli Samachar

The Janshakti News

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीच्या रेल्वेला जनतेसाठी डबेच नाहीत !| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि.१९ एप्रिल २०२४
७ मे २०२४ रोजी होणाऱ्या अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठी सांगलीतून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजय काका पाटील यांनी पक्षातर्फे दोन अर्ज दाखल केले. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे, आ. सुधीर दादा गाडगीळ, माजी आमदार नितीन शिंदे प्रकाश ढंग आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यानंतर सांगलीतील स्टेशन चौकात खा. संजय पाटील यांच्या प्रचारार्थ भव्य सभेने शक्ती प्रदर्शन करण्यात आले, यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मोदी चालक असलेल्या विकासाच्या दिशेने निघालेल्या रेल्वेमध्ये संजय काका डबा घेऊन तयार आहेत. आता यात सांगलीकरांना दिमाखाने बसायचे आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीच्या रेल्वेला फक्त इंजिनच आहेत डबे नाहीत, या इंजिनामध्ये फक्त त्या त्या पक्षाचे चालक आणि त्यांचे नातेवाईकच बसतील, जनतेला बसण्यासाठी तेथे डबेच नाहीत. तर प्रत्येक इंजिनाचे तोंड विरुद्ध दिशेला आहे त्यामुळे ती विकासाच्या दिशेने जाणार नाही, अशावेळी एकाच जागी स्थिर असलेल्या रेल्वेत जनता कशी बसणार ? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.


स्टेशन चौकात झालेल्या महायुतीच्या घटक पक्षांची भव्य सभा झाली. त्यावेळी भाजपासह राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट, शिवसेना गट, जनस्वराज्य, रयत क्रांती संघटना, यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षांच्या नेत्यांनी आणि हजारो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. सभा स्थळी मोठा पोलीस बंदोबस्त होता.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. सिंचन योजना पूर्णत्वास आल्याने सांगली सातारा सोलापूरचा दुष्काळी भाग हा आता इतिहास जमा होईल असेही त्यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, लोकसभेची निवडणूक ही ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका अथवा साखर कारखान्यांची निवडणूक नाही. पुढील पाच वर्षे देश कोणाच्या हातात द्यायचा हे ठरवण्यासाठी ही निवडणूक आहे. एका बाजूला देश गौरव, विकासपुरुष नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 22 पक्षांची महायुती आहे. तर दुसऱ्या बाजूला विकासाची दृष्टी नसलेल्या राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील 26 पक्षांची इंडिया आघाडी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला आहे. हर घर नळ, आयुष्यमान भारत, आवास योजना, उज्वला गॅस, मोफत रेशन, बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी केंद्र, तरुणांना मुद्रा लोन, अनुसूचित जाती, जमाती, आदिवासी, शेतकरी, 12 बलुतेदार यांच्यासाठी राबवलेल्या विविध योजना असल्यामुळे मोदी सरकार सर्व घटकांच्या पसंतीला उतरले आहे. मा. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, की भारत जगातील तिसरी शक्ती बनण्याचा मार्ग मोकळा होईल.विविध मान्यवरांच्या उपस्थितीत
संजय काका पाटील यांनी उमेदवारी
अर्ज दाखल केला.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित दादा पवार म्हणाले की, ज्याला साधा साखर कारखाना चालवता आला नाही तो, खासदार व्हायला निघालेला आहे. ही निवडणूक गावकी आणि भावकीची नाही. देशाचे भवितव्य ठरवणारी आहे. गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय तडफदारपणे देशाचे नेतृत्व केले आहे. जगाच्या पाठीवर भारताची शान वाढवायची आहे. स्थानिक आणि राज्यपातळीवरील निवडणुकीच्या निमित्ताने भांड्याला भांडे लागले असेल, पण आता देशाची निवडणूक आहे. त्यामुळे मतभेद बाजूला ठेवून काम करण्याची आवश्यकता आहे. दुष्काळी पट्ट्यातील. वंचित 109 गावांचा सिंचन योजनेत समावेश करण्यात आला असून एक लाख हेक्टर क्षेत्र नव्याने पोलिसाखाली येत आहे. आठ टीएमसी पाणी उपलब्ध करण्यात आले असून शेतकऱ्यांकडे पैसा आला तर बाजारपेठ हे वाढेल. सध्या शेतकऱ्यांना पाणीपट्टीची वीजबील समस्या आहे. परंतु लवकरच संपूर्ण सिंचन योजना सोलर योजनेवर करण्यात येत असल्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना पाणीपट्टी भरण्याची आवश्यकता भासणार नाही.

यावेळी बोलताना विद्यमान खासदार व भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांनी, गेल्या दोन-तीन वर्षात आपण मतदारसंघात का दिसलो नाही याचा खुलासा करून, केलेल्या विकास कामांचा उल्लेख केला. आता विस्तारित टेंभू विस्तारित म्हैसाळ योजनेमुळे वंचित गावांनाही पाणी मिळणार आहे. राष्ट्रीय महामार्गाचे जाळे आणि रेल्वे दुहेरीकरण मार्ग विद्युतीकरणाकडे गतीने वाटचाल करीत आहे. लवकरच या मार्गावरून सांगलीकरांच्या मागणीप्रमाणे सध्याच्या रेल्वे गाड्या प्रमाणेच, नव्या रेल्वे गाड्या धावतील. दहा वर्षात मतदार संघात अनेक विकास कामे केली आहेत. त्यामुळे लोक माझ्यासोबत आहेत. माझ्या खासदारकीची हॅट्रिक नक्की आहे. या खासदारकीच्या टर्ममध्ये ड्रायपोर्ट तसेच उडान दोन या योजनेतून विमानतळ व्हावे यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी आश्वासन संजय पाटील यांनी दिले..

या सभेसाठी भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, माजी आमदार भगवानराव साळुंखे, माजी आमदार नितीन शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, रमेश शेंडगे, दीपक शिंदे म्हैसाळकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे, भालचंद्र पाटील, नीता केळकर,ॲड. स्वाती शिंदे, गीतांजली ढोपे पाटील, डॉ. रवींद्र आरळी, मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे इद्रिस नाईकवाडी, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष प्राजक्ता कोरे, माझे सभापती ब्रह्मानंद पडळकर, प्रकाश जमदाडे, तम्मनगौडा रवी-पाटील, दिग्विजय चव्हाण आदी मंडळी उपस्थित होती.