Sangli Samachar

The Janshakti News

युद्ध भडकणार ? इराणवर क्षेपणास्त्रे डागत इस्रायलनेही दिले प्रत्युत्तर| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि.१९ एप्रिल २०२४
नुकतेच इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ला केला होता. आता इस्रायलनेही प्रत्युत्तर देत इराणवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याची बातमी समोर आली आहे. अमेरिकन मीडियाने वरिष्ठ अमेरिकी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. इराणमधील विमानतळावर स्फोटाचा मोठा आवाज ऐकू आला असल्याचे सांगण्यात आले आहे. इराणच्या फार्स वृत्तसंस्थेने सांगितले की, इराणच्या इसाफहान शहरातील विमानतळावर स्फोट झाल्याचे ऐकू आले परंतु त्याचे कारण लगेच कळू शकले नाही.


दरम्यान इस्रायलने इराणच्या आण्विक प्रकल्पांना लक्ष्य केल्याचे मीडिया रिपोर्ट्स सांगत आहेत. इराणच्या युरेनियम संवर्धन केंद्रस्थानी असलेल्या नतान्झसह इस्फहान प्रांतात अनेक इराणी आण्विक साइट्स आहेत. दरम्यान, अनेक उड्डाणे इराणच्या हवाई हद्दीतून वळवण्यात आल्याचे सीएनएनने वृत्त दिले आहे. इस्रायलच्या या संभाव्य हल्ल्यापूर्वीच इराणचे परराष्ट्र मंत्री हुसेन अमीर यांनी इशारा दिला होता की, इस्रायलने पलटवार केल्यास इराण चोख प्रत्युत्तर देईल. आता इस्रायलने हल्ला केला आहे. त्यामुळे मध्य पूर्व आशियात युद्ध भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

इस्रायलच्या हल्ल्याचे मीडिया रिपोर्ट्स समोर आल्यानंतर इराणने क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा सक्रिय केली आहे. 14 एप्रिलच्या हल्ल्यानंतर इस्रायलने इराणला प्रत्युत्तर दिले आहे. १ एप्रिलपासून दोन्ही देशांमध्ये तणाव सुरू झाला होता. सीरियाची राजधानी दमास्कस येथील इराणच्या दूतावासावर इस्रायलने हल्ला केला. यानंतर 14 एप्रिल रोजी इराणने इस्रायलला प्रत्युत्तर दिले.