Sangli Samachar

The Janshakti News

पुणेकरांच्या डोक्यावर घोंघावतोय मृत्यू!| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि.१९ एप्रिल २०२४
महापालिकेने शहरात अनेक ठिकाणी होर्डिंगला परवानगी दिली आहे. मात्र, त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट खरोखरच झाले आहे का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे होर्डिंगच्या रूपाने पुणेकरांच्या डोक्यावर मृत्यूच घोंघावत असल्याचे उबाळेनगर येथील होर्डिंग कोसळल्याच्या घटनेतून समोर येत आहे. नगर रस्त्यावरील वाघोलीतील साई-सत्यम पार्क परिसरातील उबाळेनगर बसथांब्याजवळील रुद्र मोटर्स येथील अधिकृत मोठे होर्डिंग बुधवारच्या वादळी पावसात कोसळले. अधिकृत असलेले होर्डिंग कोसळल्याने परवाना देताना खरच नियमांचे पालन केले जाते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरातील प्रत्येक भागातील रस्त्यांवर चौका-चौकात मोठ-मोठे होर्डिंग उभारण्यात आले आहेत. शहराला मोठ्या होर्डिंगने वेढा घातला आहे. ही होर्डिंग कधी कोसळतील याचा काही नियम नाही. अधिकृत असलेले होर्डिंगही यापूर्वी कोसळल्याच्या घडना घडल्या आहेत.

उबाळेनगर बसथांब्याजवळील कोसळलेले होर्डिंग कागदोपत्री सर्व नियमानुसार असताना देखील होर्डिंग कोसळले कसे, असा प्रश्न विचारून याचा खुलासा सादर करावा, अशी नोटीस होर्डिंग मालकाला देण्यात आली आहे. तसेच होर्डिंग मालकावर नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाकडून लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार आहे. या होर्डिंगला महापालिकेच्या आकाश चिन्ह विभागाकडून अधिकृत परवानगी देण्यात आलेली आहे. तसेच सादर केलेल्या कागदपत्रांनुसार नियमांचे पालन केलेले दिसून येत आहे. असे असताना वादळी वाऱ्यात आणि वादळी पावसात ते कोसळल्याने होर्डिंगच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे.तसेच या होर्डिंगबाबत खासगी अभियंत्याने स्ट्रक्चरल रिपोर्ट केला होता. या रिपोर्टमध्ये काही तृटी आहेत काय, याचीदेखील चौकशी केली जाणार असल्याचे मुख्य परवाना निरीक्षक गणेश भारती यांनी 'सीविक मिरर'ला सांगितले.


पुण्यातील अनेक भागात बुधवारी वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. खराडीसह, वाघोली, मांजरी गावांना गारांच्या पावसाने झोडपले. जोराच्या वाऱ्याने उबाळेनगरमधील मोठे होर्डिंग कोसळले. यामुळे नगर रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. हे होर्डिंग पडल्यामुळे एका चार चाकीचे नुकसान झाले आहे. या विरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. होर्डिंग कोसळल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी महापालिका याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे. शहरात यापूर्वी होर्डिंग पडून मोठ्या दुर्घटना घडून काही जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यानंतरही महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाकडून होर्डिंग उभारण्याची परवानगी दिल्यानंतर नियमांचे पालन केले आहे का नाही याची साधी पाहणीदेखील केली जात नाही. त्यामुळे शहरातील अनेक होर्डिंग कागदोपत्री सर्व नियमानुसारच आहेत. परंतु प्रत्यक्षात मात्र कमकुवत असल्याचे अशा घटनांवरून स्पष्ट होत आहे.

शहरात उभारलेल्या होर्डिंग मालकांनी आकाशचिन्ह विभागाकडून परवाना घेण्यात उदासीनता दाखविली होती. आतापर्यंत किती होर्डिंग मालकांनी परवान्याचे नूतनीकरण केले याची माहितीही आकाशचिन्ह विभागाकडून देण्यास टाळाटाळ केली जाते. आकाशचिन्ह विभागाच्या अहवालानुसार, १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२६ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी १८२६ होर्डिंग परवान्यांचे नूतनीकरण करणे आवश्यक होते. होर्डिंग नूतनीकरण न केल्यास होर्डिंग्ज बेकायदेशीर ठरवले जातील, असा इशारा आकाशचिन्ह विभागाने दिला होता. त्यानंतर एकूण ११७३ जणांनी नूतनीकरण केल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र त्यानंतर किती जणांनी परवान्याचे नूतनीकरण केले याची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

अखेर होर्डिंग पाडले

महापालिकेची दिशाभूल करून टिळक चौकातील संभाजी पोलीस चौकीच्या मागे तीन होर्डिंग उभारण्यात आले होते. महापालिकेच्या जागेवर आणि नदीपात्रात हे होर्डिंग उभारले होते. हे होर्डिंग उभारताना नियमांचे पालन करण्यात आले नव्हते. तसेच त्याची पाहणीही करण्यात आली नव्हती. हे प्रकरण समोर आल्यानंतर महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभारण्यात आले होते. त्यानंतर कसबा-विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयातील तीन निरीक्षकांचे निलंबन करण्याची वेळ महापालिकेवर आली होती. त्यानंतरही बेकायदा असलेले होर्डिंगला कायदेशीर मान्यता घेण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र त्यावर टीका झाल्याने महापालिकेने कारवाई करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर कारवाई थांबविण्याचा निर्णय घेऊन एक प्रकारे होर्डिंगला अभयच देण्यात आले होते. भाजपच्या बड्या नेत्याच्या दबावाला बळी पडून कारवाई होत नसल्याची चर्चा रंगली होती. मात्र प्रसार माध्यमांचा दबाव आणि पुणेकरांच्या तीव्र प्रतिक्रियांमुळे आयुक्तांनी हे होर्डिंग पाडण्याचा निर्णय घेतला होता.

चार जणांचे प्राण गेले

पुण्यातील जुना बाजार चौकात अनधिकृतपणे उभारलेलं होर्डिंग अंगावर पडून चार जणांचा मृत्यू झाला होता. यावेळी आठ जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. जुना बाजार चौकात रेल्वेच्या जागेमध्ये अनधिकृतपणे उभारण्यात आलेली होर्डिंग्ज काढत असताना ही घटना घडली होती. रेल्वे प्रशासनाकडून होर्डिंग्ज काढण्याचं काम केले जात होते. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. यानंतर होर्डिंगबाबत कडक धोरण राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

अनधिकृत फ्लेक्स, कमानींचा धोका

शहरात उभारलेल्या मोठ्या होर्डिंगसह राजकीय पक्षांकडून तसेच मंडळाकडून ठिकठिकाणी उभारण्यात येणाऱ्या स्वागत कमानी, अनधिकृत प्लेक्स, लोखंडी फलक तसेच क्लास चालक, बांधकाम व्यावसायिकांनी लावलेले फ्लेक्स अचानक कोसळतात. त्यामध्ये अनेक वेळा पादचारी, दुचाकी चालकांना दुखापत झाल्याच्या घटना घडत आहेत. मात्र यावर महापालिकेकडून जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात आहे.

नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत एकूण ४३८ अधिकृत होर्डिंग उभारण्यात आलेले आहेत. उबाळेनगर येथील पडलेले होर्डिंग अधिकृत आहे. वाऱ्याच्या वेगात ते पडल्याने आता याची चौकशी केली जाणार आहे. तसेच लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार केली जाणार असून गुन्हा दाखल केला जाणार आहे.