Sangli Samachar

The Janshakti News

दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांवर आता नापासचा शिक्का नाही !



| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि.१९ एप्रिल २०२४
नुकत्याच दहावी, बारावीच्या परीक्षा संपल्या असून, आता मुलांना निकालाचे टेन्शन आहे. निकालात कोणी उत्तीर्ण तर कोणी अनुत्तीर्ण होईल. मात्र, आता अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांवर नापासचा शिक्का बसणार नाही. अशा विद्यार्थ्यांना सहा महिन्यांचे कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे; तसेच जुलैमध्ये पुरवणी परीक्षेच्या साह्याने त्यांना उत्तीर्ण होण्याची संधीदेखील मिळणार आहे.

दहावी, बारावीच्या परीक्षेत विद्यार्थी नापास झाल्यास पुढील शिक्षणात या विद्यार्थ्यांना रस राहात नाही. अनेकांना नापास झाल्यामुळे पुढे शिकण्याची इच्छा नसते. अशा दहावी नापास झालेल्या विद्यार्थी व पालकांचे शाळेतच समुपदेशन केले जाणार आहे. त्यानंतर या विद्यार्थ्यांना सहा महिने कालावधीचे रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थी दहावीच्या पुरवणी परीक्षेलादेखील बसू शकतील. याचदरम्यान एटीकेटीच्या माध्यमातून अशा विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया न जाता त्यांना कौशल्याचे धडे घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.


आधी शिक्षकांचे समुपदेशन

दहावी, बारावीचा निकाल ऑनलाइन जाहीर करण्यात येतो. त्यानंतर निकाल त्या-त्या केंद्रांवरून वितरित केला जातो. शाळा, महाविद्यालयांचा निकाल घेण्यासाठी आलेल्या शिक्षकांना बोर्डाच्या प्रतिनिधीकडून समुपदेशन केले जाणार आहे. त्यानंतर हे शिक्षक नापास विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणार आहेत.

पालकांची भूमिका महत्त्वाची

विद्यार्थी नापास झाला की, पालक मुलांना दोष देतात. पास झाला तरी अनेक पालक मुलांना टक्केवारीच्या कोंडीत पकडतात. अशा परिस्थितीत पालकांनी विद्यार्थ्यांना धीर देण्याची गरज असते. त्यामुळे पाल्यांना सावरून त्यांना योग्य दिशा देणाची पालकांची तयारी असायला हवी.

फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या दहावी, बारावीच्या परीक्षेत विद्यार्थी नापास झाले, तर या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळाकडून जुलैमध्ये पुरवणी परीक्षा घेतली जाते; तसेच कौशल्य शिक्षणाच्या कालावधीतच ही पुरवणी परीक्षा आटोपून विद्यार्थ्यांचा नवा निकालही जाहीर केला जातो. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे कुठलेही शैक्षणिक नुकसान होऊन वर्ष वाया जात नाही. त्यामुळे नापास म्हणता येणार नाही. पालकांनी याकडे सकारात्मक दृष्टीने बघायला हवे.'' असे विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव वैशाली जामदार यांनी म्हटले आहे