Sangli Samachar

The Janshakti News

सांगली, मिरज, कुपवाड महापालिका आयुक्तपदी शुभम गुप्ता, तातडीने हजर होण्याच्या सूचना



सांगली समाचार -  दि  ८ एप्रिल २०२४
सांगली  - गेल्या काही दिवसांपासून रिक्त असलेल्या सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या आयुक्तपदी शुभम गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुप्ता यांची मार्च महिन्यात जळगाव व नंतर बुलढाणा जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली होती. त्यांनी बुलढाण्याचा पद्भार स्वीकारला नसल्याने सोमवारी त्यांची सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती केली.

मार्चमध्ये राज्यातील आयुक्त, उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात सांगलीतील आयुक्त व तीन उपायुक्तांची बदली करण्यात आली होती. सुनील पवार यांच्या बदलीनंतर आयुक्तपद गेल्या काही दिवसांपासून रिक्त हाेते. सोमवारी त्याजागी गुप्ता यांची निवड करण्यात आली आहे. गुप्ता हे २०१९च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे आयएएस आहेत. देशात ६ व्या क्रमांकासह त्यांनी आयएएस परीक्षा उत्तीणे केली होती. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात सहाय्यक जिल्हाधिकारी, नाशिक जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी त्यानंतर धुळे येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले होते. त्यानंतर मार्चमध्ये सुरुवातीला त्यांची जळगाव जिल्हा परिषदेत व नंतर बुलढाणा जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्तीचे आदेश देण्यात आले होते. पण नियुक्तीच्या ठिकाणी हजर न झाल्याने आता त्यांची सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेला बदली करण्यात आली आहे. याठिकाणी तातडीने त्यांना हजर होण्याच्या सुचना दिल्या आहेत.

मूळ राजस्थानचे, नाते महाराष्ट्राशी

गुप्ता यांचे कुटुंब राजस्थानमधील सीकरचे. काही काळ सीकरमध्ये वास्तव्य करुन ते जयपूरमध्ये स्थायिक झाले. २००७ पर्यंत ते सर्व जयपूरमध्ये राहत होते. त्यानंतर त्यांचे कुटुंब महाराष्ट्रातील डहाणू येथे स्थलांतरीत झाले. त्यामुळे महाराष्ट्राशीही त्यांचे चांगले नाते राहिले आहे.