Sangli Samachar

The Janshakti News

उद्धव ठाकरेंनी पाठिंब्याबाबत शब्द फिरवला; राजू शेट्टींचा थेट आरोपसांगली समाचार -  दि ८ एप्रिल २०२४
हातकणंगले - कदाचित त्यांना साखर कारखानदार भेटले असतील, अशी टीका 'स्वाभिमानी'चे नेते राजू शेट्टी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. आपणाला शिवसेनेत येण्याचा सल्ला देणारे संजय राऊत हे 'स्वाभिमानी'त येऊन शिवसेनेचे काम करणार आहेत का, असा सवालही त्यांनी केला.

राजू शेट्टी म्हणाले, भाजपविरोधातील मतांमध्ये विभागणी होऊ नये, यासाठी हातकणंगलेमध्ये शिवसेनेने आम्हाला पाठिंबा द्यावा, यासाठी प्रयत्न होता. मात्र, आघाडीसोबत येण्याची त्यांची अट आम्हाला मान्य नव्हती. शेवटी त्यांना 'मशाल' चिन्हावर लढण्याची ऑफर दिली. चळवळ संपवून मला राजकारण करायचे नसल्याने तो प्रस्ताव नाकारला. उद्धव ठाकरे यांनी पाठिंब्याबाबत शब्द दिला होता, तो त्यांनी पाळणे अपेक्षित होते. महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे नेतेपद देण्यासाठी आपण सूचक आणि छगन भुजबळ हे अनुमोदक होते. माझ्यामुळेच ते नेते झालेत, हे विसरू नये.

तुपकरांना पाठिंबा, पण प्रचार नाही

राज्यात हातकणंगले, सांगली, माढा, बुलढाणा, परभणी येथे उमेदवार उभा करण्याचा विचार आहे. शेवटी निवडणुकांसाठी पैसे लागतात, अनेकांनी इच्छा व्यक्त केली, पण आर्थिक स्थिती पाहून निर्णय घेण्याची मोकळीक त्यांना दिली आहे. बुलढाण्यातून रविकांत तुपकर यांना पाठिंबा आहे, पण आपण हातकणंगलेत व्यस्त असल्याने प्रचारासाठी जाऊ शकत नसल्याचे शेट्टी यांनी सांगितले.


'डी.सीं.च्या मागे कोण?

वंचित आघाडीकडून रिंगणात असलेले डी.सी. पाटील हे अजूनही भाजपचे सक्रिय सदस्य आहेत. त्यांनी अद्याप राजीनामा दिला नसल्याने यामागे कोण आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नसल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

वसंतदादांचे घराणे संपवण्याचे षडयंत्र

मागील लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांच्यासाठी बाळासाहेब थोरात यांनी एक सभा घेतली असती तर ते विजयी झाले असते. पण ते सांगली जिल्ह्यात असतानाही आले नाहीत. आता जे काही चालले ते वसंतदादा यांचे घराणे संपवण्याचे षडयंत्र असल्याची टीका शेट्टी यांनी केली.शिवसेनेशी गद्दारी केल्याबद्दल विद्यमान खासदारांबद्दल शिवसैनिकांमध्ये राग आहे, जर त्यांना पराभूत करायचे असेल तर राजू शेट्टींना बळ दिले पाहिजे, अशी त्यांची भावना होती. त्यातूनच उद्धव ठाकरे व आपल्या भेटी झाल्या, त्यातून सकारात्मक चर्चा सुरू असतानाच ठाकरे यांनी शब्द फिरवला.