Sangli Samachar

The Janshakti News

जागावाटपाचा तेढ वाढला; महाआघाडीला कुणाची 'नौटंकी' पडणार भारी?सांगली समाचार - दि ८ एप्रिल २०२४
मुंबई- लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन तीन आठवडे उलटले तरी महायुती आणि महाविकास आघडीतील काही जागांवरील घोळ मिटण्याचे नाव घेताना दिसत नाही. महाविकास आघातीत सांगलीवरून  सुरू झालेला काँग्रेस - ठाकरे गटातील वाद तुटेपर्यंत ताणला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच ठाकरे गटाचे नेते आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कलगीतुरा रंगला. परिणामी सांगलीवरून महाविकास आघाडीत ठिणगी पडणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

सांगली लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारासाठी राऊत सांगलीत तळ ठोकून होते. मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी प्रामुख्याने काँग्रेसला विश्वासात न घेता ठाकरेंनी उमेदवार दिली आहे. ही जागा काँग्रेसची असून तेथून आमचाच उमेदवारी लढणार, अशी भूमिका काँग्रेसच्या सांगलीसह राज्यातील नेत्यांनी घेतली आहे. यावर आघाडीतील पक्ष पवार गट आणि काँग्रेसने नौटंकी बंद करावी, असे राऊतांनी सुनावले.

सांगलीतून आमचाच, उमेदवार चंद्रहार पाटील लढणार असून त्याबाबत काँग्रेसच्या हायकमांडशी चर्चा झाली आहे. पाटलांची उमेदवारी उद्धव ठाकरेंनी  जाहीर केली असून ती काळ्या दगडावरची रेष आहे. सांगलीत आमची कोंडी कराल तर राज्यभर तुमची कोंडी करू. त्यामुळे काँग्रेस आणि शरद पवार गटाने नौटंकी बंद करावी, अशा शब्दात राऊतांनी ठासून सांगत उमेदवार मागे घेण्यात येणार नाही, असेच सूचित केले आहे. राऊतांची भाषा काँग्रेसच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचे दिसून येत आहे. त्यावरून पटोलेंनीही राऊतांना त्यांच्याच भाषेत सडेतोड प्रत्युत्तर दिले. 


राऊत हे ठाकरे गटाचे मोठे नेते आहेत. त्यांनी असे लहान कार्यकर्त्यांसारखी वक्तव्ये करू नयेत. आपल्या भाषेवर, शब्दांवर मर्यादा घालाव्यात. सांगलीचा तिढा सामोपचाराने सोडवण्यावर आमचा भर आहे. त्यामुळे राऊतांनी छोट्या कार्यकर्त्यांसारखी विधाने करून आघाडीत तेढ निर्माण होईल, अशी विधाने टाळावीत, असा सल्लाच पटोलेंनी राऊतांना दिला आहे. यावर मी जबाबदारीने बोलणारा माणूस असल्याचे राऊत म्हणाले आहे.

दरम्यान, सांगलीवरून निर्माण झालेल्या महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि काँग्रेसमधील वाद टिपेला पोहोचण्याची शक्यता आहे. सांगली राखण्यासाठी काँग्रेसचे नेते विश्वजीत कदमांनी दिल्लीत हायकमांड यांना गळ घातलेली आहे. त्यातच सांगलीत प्रचारासाठी आलेल्या राऊतांच्या आक्रमक विधानांनी काँग्रेसचे नेते बिथरल्याचे दिसते. त्यामुळे महाआघाडीत सांगलीवरून सुरू झालेली नौटंकी कुणाला भारी पडणार, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.