Sangli Samachar

The Janshakti News

विशाल दादांच्या सांगलीतील पत्रकार परिषदेकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष



सांगली समाचार - दि. ८ एप्रिल २०२४
सांगली - लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर सांगलीच्या पारंपारिक मतदार संघात स्व. वसंतदादांचे नातू आणि महाराष्ट्रातील काँग्रेसचे तडफदार नेते विशाल दादा पाटील यांनाच इथून उमेदवारी मिळणार आणि भाजपसह सांगलीतील भाजप उमेदवार  संजय काका पाटील यांचा विजय रथ रोखणार असेच चित्र निर्माण झाले होते. 

विशाल दादांनीही यासाठी मोठे कष्ट घेतले होते. पण येथे शिवसेनेची माशी शिंकली आणि सारी परिस्थितीच पालटली. मिरजेत येऊन उद्धव ठाकरे व राऊत यांनी पै. चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर सभेतून काँग्रेसवर लादली. त्यामुळे विशाल पाटील यांनी घेतलेले कष्ट व काँग्रेस नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली. विशेषतः हा प्रकार माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या जिव्हारी लागला. कारण पलूस येथील जाहीर कार्यक्रमात विशाल पाटील हेच आगामी लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार संसदेत जातील, असे जाहीर केले होते. पण शिवसेनेच्या आगळकीमुळे याला खो बसला.


नंतरच्या काळात जे काही महाभारत घडले ते सर्वश्रुत होत आहे. या पार्श्वभूमीवर काल सांगलीतील, गुलाबराव पाटील फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीत उपस्थित राहून, विशाल पाटील यांनी उद्या पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट करू असे सांगितल्याने आणि एकूणच त्यांच्या देहबोलीवरून, राज्य व केंद्र काँग्रेस श्रेष्ठीकडून त्यांना मिळालेला संदेश महत्त्वाचा ठरला आहे. आता विशाल पाटील आज काय भूमिका जाहीर करणार ? याकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.