Sangli Samachar

The Janshakti News

उन्हाच्या गरमीत राजकारण तापणार; उष्णतेचा पारा वाढणार, कार्यकर्त्यांनो काळजी घ्या !सांगली समाचार -  दि. ३ एप्रिल २०२४
मुंबई  - देशात आगामी लोकसभा निवडणूका पार पडणार असून, सगळीकडे निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यानुसार प्रत्येक पक्ष आपापल्या परीने जोरदार प्रचार करत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती आणि प्रचाराची तयारी सर्व पक्षांनी सुरु केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी इंडिया आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. तर, दुसरीकडे भाजपने देखील 'अबकी बार 400 पार, तीसरी बार मोदी सरकार..' असा नारा दिला आहे. महाराष्ट्रात पहिल्या दोन टप्प्यात निवडणूक प्रचार जोरात सुरु झाला आहे.  त्याचवेळी मार्च महिन्यातील उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. निवडणुकीच्या प्रचाराच ज्वर जसजसा वाढणार आहे, तसतसा उन्हाचा पारा वाढणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) यंदा महाराष्ट्रास देशातील सहा राज्यांमध्ये अधिक तापमान असणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.


यंदा एप्रिल ते जून या तीन महिन्यांत तापमान जास्त राहणार आहे. तसेच यावर्षी तीन महिन्यांतील 20 दिवस उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक प्रचारासोबत उन्हाचा पार देखील चांगलाच वाढणार आहे. महाराष्ट्रात पुढील आठवड्यात तापमान 2 ते 5 अंशांनी वाढू शकते. एप्रिल-जून दरम्यान भारताच्या बहुतांश भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. मैदानी भागांमध्ये उष्णतेची लाट सामान्यपेक्षा जास्त असेल, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे संचालक मृत्यूंजय महापात्रा यांनी दिली.

महाराष्ट्रात 19 आणि 26 एप्रिल रोजी विदर्भ आणि मराठवाड्यात मतदान होणार आहे. एप्रिल महिन्यात कमाल तापमान 2 ते 3 अंशांनी वाढणार आहे. राज्यात तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मतदान होणार आहे. चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मतदान होणार आहे. पाचवा टप्पा 20 मे रोजी उत्तर महाराष्ट्र मुंबईत आहे. या भागांत निवडणुकी दरम्यान सरासरीपेक्षा जास्त तापमान असणार आहे.

महाराष्ट्रात उष्माघाताचा पहिला बळी;

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कमाल तापमान 39 अंश सेल्सियसवर पोहोचले आहे. या वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यात पहिला उष्माघाताचा बळी गेला आहे. पैठण तालुक्यातील बिडकीनमध्ये राहणाऱ्या गणेश कुलकर्णी या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

गणेश कुलकर्णी (30) हा तरुण पैठण तालुक्यातील बिडकीन याठिकाणी एका खासगी कंपनीत कामाला होता. तो जैनपूर मार्गाने बिडकीनकडे जात असताना त्याला अचानक चक्कर आली आणि तो रस्त्यावर कोसळला. यावेळी त्याच्या तोंडातून फेस आला. त्यामुळे त्याला तातडीने बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. मात्रे यांनी गणेशला तपासून मृत घोषित केले. तसेच गणेशचा मृत्यू हा उष्माघाताने झाल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांना देण्यात आली.