सांगली समाचार - दि ७ एप्रिल २०२४
मुंबई - एप्रिल आणि मे महिन्यात देशात प्रचंड उष्णता वाढण्याची शक्यात आहे. हवामान खात्याने एप्रिल आणि मे मध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाजवर्तवला आहे.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये तापमाणाचा पारा 40 अंशांच्या वर नोंदवला गेला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून देखील ॲडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. सोलापूरमध्ये हंगामातील उच्चांकी म्हणजेच 43.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात लोकांनी कडक उन्हात घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
देशात ऊन-पावसाचा खेळ...
भारतीय हवामान खात्याने 9 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रासह अरुणाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, पंजाब आणि इतर राज्यांसह विविध राज्यांमध्ये पाऊस आणि उष्णतेच्या लाटेच्या स्थितीचा अंदाज वर्तवला आहे. अरुणाचल प्रदेशच्या ईशान्य भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर कर्नाटक, झारखंड, रायलसीमा, किनारी आंध्र प्रदेश आणि यानममध्ये उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. हवामान विभागाने सोमवारी विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये गारपीट होण्याचा इशारा दिला आहे, तर आज विदर्भातील अमरावती आणि यवतमाळमध्ये उष्ण लाटेचा येलो अलर्ट जारी केला आहे.
विदर्भात सूर्य आग ओकणार
दक्षिण तमिळनाडू ते आग्नेय मध्य प्रदेशापर्यंत वातावरणाच्या खालच्या स्तरात हवेची एक द्रोणीय रेषा तयार झाली आहे. ही द्रोणीय रेषा महाराष्ट्रात विदर्भावरून जाते. या द्रोणीय रेषेमुळे वातावरणावर परिणाम झाला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस महाराष्ट्रात विशेषत: विदर्भात तापमानात वाढ होण्याची शक्यात आहे. यवतमाळ, अकोला आणि चंद्रपूरमध्ये उष्णतेची लाटेचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मुंबईसह कोकणात उकाडा वाढणार
मुंबईसह, कोकणातील हवामानात देखील वेगाने बदल होणार आहे मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात हवेतील आर्द्रता वाढू शकते. यामुळे या भागातील उकाडा वाढणार असल्याचा अंदाज देखील हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळात अतिशय महत्त्वाचे काम नसताना घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच या काळात सतत पाणी पिण्याचा आणि त्रास होत असेल तर तात्काळ डॉक्टरांना भेटण्याचा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे.
राज्यात दोन दिवस पावसाचाही अंदाज
मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट कायम असताना पुढील दोन दिवस वादळीवाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. रविवारी 7 एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच सोमवारपासून 8 एप्रिलपासून विदर्भ आणि मराठवाड्यात गारपिटीचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ऐन उन्हाळ्यात राजस्थानात पाऊस
गेल्या 24 तासांत राजस्थानच्या अनेक भागात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची नोंद झाली. हवामान केंद्र जयपूरनुसार, गेल्या 24 तासांत जोधपूर, उदयपूर, अजमेर, कोटा, जयपूर, भरतपूर विभागाच्या काही भागात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची नोंद झाली आहे. अजमेर, जैसलमेर आणि भोपाळगडमध्ये प्रत्येकी 14 मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात रिमझिम आणि हलका पाऊस सुरू आहे.