Sangli Samachar

The Janshakti News

मोबाईल प्रेमाने कमी झाला जिव्हाळा, व्यसन ठरतेय घातक| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि.२३ एप्रिल २०२४
अलीकडे धावपळीमुळे निवांतपणा, विश्रांती, स्वतःसाठी वेळ काढणे हरवले आहे. स्पर्धेमुळे दगदग आणि ताणतणाव वाढले आहेत. पन्नाशीनंतर मधुमेह, उच्च रक्‍तदाब यासारखे आजार वाढलेत. मानसिक विकाराच्या विळख्यात चिमुकल्यांपासून तर प्रौढ अडकत चालले आहेत. परिणामी नैराश्‍य व विस्मरणाचे प्रमाण वाढत आहे. आयुष्यात कुटुंबातील सदस्यांपेक्षा मोबाईल अधिक जवळचा वाटू लागला आहे, जणू प्रत्येकाला मोबाईलचे व्यसन लागले आहे.

हातात मोबाईल घेऊन एकट्यानेच जगण्याचे दिवस आले आहेत. यामुळे आगामी दहा वर्षांत एकाकीपणाचे आजार अधिक गंभीर रुप धारण करतील. तासभर मोबाईल घेतला नाही, तर मन बैचन होते. ही अवस्था मोबाईलमुळे मिळालेल्या मानसिक आजाराचे निमंत्रण आहे. मोबाईलच्या सवयीमुळे भविष्यात डोळ्यांपासून कानापर्यंत, मेंदू, कॅन्सरच्या विळख्यात शरीर सापडते, याचीही जाणीव ठेवण्याची गरज आहे. यामुळे मोबाईलपासून दूर राहावे असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रवीण नवखरे यांनी दिला आहे.

मोबाईल नव्हता त्यावेळी लोक व्यस्त राहण्यासाठी मैदानी खेळ खेळायचे. पुस्तकांचे वाचन करण्यासाठी लायब्ररी संस्कृती होती. ती हरवली आहे. लेख लिहिणे, कविता करणे, नाटकात काम करणे, गाणी गाणे, नृत्य करणे, वृक्षारोपण करणे यांसारखे छंद जोपासण्यात येत असे. यामुळे त्यांचा मेंदू कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त असायचा. आता मोबाईलने मानवी मेंदूवर आक्रमण करून ही संस्कृतीच उध्वस्त केली. यामुळेच मोबाईलमुळे मानसिक विकार वाढले आहेत.

भविष्यातील धोके

कमी ऐकू येणे,कान दुखणे.
कानात वेगवेगळे आवाज ऐकू येणे.
लक्षात न राहणे किंवा सतत काही विसरणे.
आळस येणे, चिडचिड करणे.
ब्रेन ट्यूमर होण्याची शक्‍यता.
कॅन्सरचा धोका.
डी जीवनसत्त्वाचा अभाव.

मोबाईलमुळे काय काय होते

'स्ट्रेस बर्न आऊट स्थिती निर्माण झाली.
झोपेची प्रक्रिया विस्कळित झाली.
विश्रांतीसाठीची पहिल्या चार तासांची झोप हरवली.
चालण्याचे, फिरण्याचे प्रमाण कमी झाले.
मोबाईलमुळे आळशीपणा आला.
पुस्तकी अभ्यासापासून दुरावले गेले.
मोबाईलने सुट्ट्यांचा आनंदही हिरावला.
मैदानी खेळ हरवले.
एकटेपणा वाढला.
अस्थिर मनोवृत्तीमुळे आक्रमकपणा वाढला.

काय करायला हवे ?

मोबाईलच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी
कुटुंबात संवाद वाढवावा.
मुलांशी पालकांनी एकमेकांशी कुटुंबाबद्दल चर्चा करावी.
पालकांनी मुलांसोबत कॅरिअरसंदर्भात चर्चा करावी.
मुलांनी कुटुंबासोबत, मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालवावा.
व्यायामासह मैदानी खेळांकडे लक्ष द्यावे.
एखादा छंद जोपासावा.