Sangli Samachar

The Janshakti News

गुलाबी साडीचा विषय सोडा.. आता आकाशात दिसणार चक्क 'गुलाबी चंद्र'!| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि.२१ एप्रिल २०२४
23 एप्रिल रोजी यंदाच्या चैत्र ऋतूमधील पहिली पौर्णिमा असणार आहे. या दिवशीच्या चंद्राला 'पिंक मून' असं म्हटलं जातं. या दिवशीचा चंद्र हा सामान्यपणे दिसणाऱ्या चंद्रापेक्षा काही पट मोठा आणि अधिक चमकदार दिसेल, असं वैज्ञानिकांनी स्पष्ट केलं आहे. मात्र हा चंद्र खरोखरच गुलाबी असेल का?

या पौर्णिमेला दिसणाऱ्या चंद्राला 'पिंक मून' असं म्हटलं जात असलं, तरी हा चंद्र खरोखरच गुलाबी दिसणार नाही. या चंद्राला पिंक मून असं नाव पडण्यामागे वेगळीच कारणं आहेत. यातील प्रमुख कारण म्हणजे, चैत्र ऋतू. 


चैत्र ऋतूमध्ये कित्येक ठिकाणी नव्याने फुलं फुलू लागतात. नॉर्थ अमेरिकेमधील फ्लॉक्स सुबुलाटा नावाचं एक जंगली फूलही याच कालावधीमध्ये फुलतं. हे गुलाबी फूल असल्यामुळे, चैत्र ऋतूमधील पहिल्या पौर्णिमेच्या चंद्राला Pink Moon म्हटलं जातं.

विविध धार्मिक मान्यता

चैत्र ऋतूमधील पहिली पौर्णिमा ही कित्येक धर्मांसाठी महत्त्वाची आहे. हिंदु धर्मामध्ये याच दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते. एवढंच नाही, तर या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीची पूजाही केली जाते.

ख्रिश्चन धर्मामध्ये ही इस्टरच्या आधीची पौर्णिमा असते, त्यामुळे या चंद्राला 'पास्कल मून' म्हणूनही ओळखलं जातं. श्रीलंकेमध्ये या पौर्णिमेला राष्ट्रीय सुट्टी असते. याच दिवशी गौतम बुद्धांनी दुसऱ्यांदा श्रीलंकेला भेट दिली होती, त्यामुळे ही सुट्टी दिली जाते. यंदाचा पिंक मून हा 23 तारखेच्या रात्री पहायला मिळेल.