Sangli Samachar

The Janshakti News

केजरीवाल यांचे इन्सुलिन ईडीने अडवले; ईडी अत्यंत क्षुद्र राजकारण करत असल्याचा कोर्टात आरोप| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि.२१ एप्रिल २०२४
आपल्या खाण्यावरून ईडी अत्यंत क्षुद्र आणि हीन पद्धतीचे राजकारण करत आहे, असा आरोप करत तुरुंगात इन्सुलिन इंजेक्शन दिले जावे यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज न्यायालयात याचिका दाखल केली. रक्तशर्करा वाढवून वैद्यकीय जामीन मिळवण्यासाठी ते आंबे खात असल्याचा ईडीचा दावाही हास्यास्पद आणि धादांत असत्य म्हणत केजरीवाल यांनी फेटाळला. इन्सुलिनचे प्रकरण मी कोर्टात आणणार या पूर्वकल्पनेनेच ईडीने आंब्यांचा गवगवा केल्याचा दावा त्यांनी केला.

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांना इन्सुलिनची गरज असून तसे इंजेक्शन दिले जावे, असे निर्देश तुरुंगाधिका-यांना देण्याची मागणी केजरीवाल यांच्या वतीने त्यांचे वकील अभिषेक सिंघवी यांनी केली. अटक झाल्यापासून केजरीवाल यांना त्यांच्या साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी इन्सुलिन देण्यात आलेले नाही, हे 'धक्कादायक' आणि 'भयानक' आहे.


जामिनासाठी मी पक्षाघाताचा धोका ओढवून घेईन का… 

डॉक्टरांनी तयार केलेल्या चार्टनुसारच आपला आहार सुरू असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे. जामिनासाठी मी अशी साखर वाढवून पक्षाघाताचा धोका ओढवून घेईन का, अशी विचारणाही केजरीवाल यांच्या वतीने सिंघवी यांनी केली. मला फक्त तीन वेळा आंबे पाठवण्यात आले होते. 8 एप्रिलनंतर एकही आंबा पाठवला गेला नाही. आंबे म्हणजे जणू काही साखरेचे बॉम्बच असावेत असे ईडी केवळ सवंग प्रसिद्धीसाठी दाखवते आहे. ईडी पूर्णपणे खोटी आणि हास्यास्पद विधाने करून मीडियाला माहिती पुरवते आहे, याबद्दलही केजरीवाल यांनी नाराजी व्यक्त केली.

वारंवार विनंती करूनही इन्सुलिन देण्यास नकार

केजरीवाल हे गेल्या 22 वर्षांपासून मधुमेहाने त्रस्त आहेत. 2012 पासून त्यांना दररोज इन्सुलिन दिले जात आहे. 1 फेब्रुवारी 2024 पासून, काळजीपूर्वक वैद्यकीय देखरेखीखाली त्यांचा 'इन्सुलिन रिव्हर्सल प्रोग्राम' सुरू झाला आणि इन्सुलिन बंद करण्यात आले होते. पण अटकेमुळे ते आयआरपीचे पालन करू शकले नाहीत. यासाठी त्यांना इन्सुलिन देणे आवश्यक होते. मात्र, वारंवार विनंती करूनही त्यांना इन्सुलिन दिले जात नाही, ज्यामुळे त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी चिंताजनकरित्या वाढली आहे, असे सिंघवी यांनी सांगितले. कोर्टाने या प्रकरणी सोमवारपर्यंत आपला आदेश राखून ठेवला.