सांगली समाचार - दि. ७ एप्रिल २०२४
सांगली - 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत धावाधाव करण्याची वेळ विशाल दादांसारख्या कर्तृत्ववान नेतृत्वावर आली आहे. ते सातत्याने टीकेचे धनी का होत गेले ? याचा विचार खरं तर त्यांच्यापेक्षा, त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनी आणि विशाल दादांना अडचणीत आणणाऱ्यांनी करायला हवा. 'स्व. वसंतदादांचे नातू आणि स्व. प्रकाश बापूंचे सुपुत्र' ही ओळख घेऊन विशाल दादांनी सहकारात व राजकारणात पाऊल ठेवले. पण अगदी पहिल्या दिवसापासूनच त्यांच्या मार्गात काटे पसरवण्याचेच काम केले गेले.
'वसंतदादा सहकारी साखर कारखाना विशाल दादा सक्षमपणे चालू शकले नाहीत !' हा आरोप त्यांच्यावर सातत्याने केला जात आहे. पण याचा विचार कोणीच करीत नाही की, ज्या वेळेला विशाल दादांच्या हाती वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदाची सूत्रे आली, त्यावेळी कारखान्याची परिस्थिती काय होती ? तो सुधारण्यासाठी विशाल दादांनी केलेले प्रयत्न यशस्वी होऊ नयेत, हाच प्रयत्न कोणी कोणी केला ? स्व. वसंतदादा व त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक कष्टांनी व प्रयत्नाने शेतकऱ्यांचा, शेतकऱ्यांसाठी सहकारी साखर कारखाना उभा केला, तो नावारुपालाही आणला. 'आशिया खंडातील सर्वात मोठा साखर कारखाना' ही ओळख स्व. वसंतदादांनी 'शेतकरी सहकारी साखर कारखान्याला' मिळवून दिली. पण त्यांच्यानंतर वसंतदादा सहकारी साखर कारखाना सक्षमपणे चालू न शकण्यात केवळ विशाल दादाच कारणीभूत आहेत का ? मग अशावेळी या सगळ्या प्रश्नांच्या जंत्रावळीची उत्तरे त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनीच शोधावीत.
स्व. प्रकाश बापूंच्या दुर्दैवी निधनानंतर राजकारणाची धुरा प्रतीक पाटलांच्या हाती गेली. त्यावेळी आक्रमकपणे 'काही करू पाहाणा-या' विशाल दादांना कोणी, का व कसे रोखले ? हे पाहण्याची गरज कोणालाच वाटत नाही का ? विशाल दादांच्याकडे आक्रमक नेतृत्व आहे. पण हे नेतृत्व उदयाला आले तर आपल्यालाच घातक ठरेल, या भीतीने सहकारातील व राजकारणातील स्वार्थी दुष्ट प्रवृत्तीनेच विशाल दादांचा सातत्याने घात केला. या साऱ्या परिस्थितीवर मात करीतही विशाल दादा आज ठामपणे उभे आहेत.
विशाल दादांच्या काही चुका झाल्याही. सुरुवातीस त्यानी काही ठराविक कार्यकर्त्या व्यतिरिक्त जिल्ह्यातील इतर कार्यकर्त्यांशी वा जनतेशी संपर्क ठेवला नाही. केवळ काही ठराविक खाजगी व पक्षाच्या कार्यक्रमात त्यांचे दर्शन व्हायचे. पण सर्वांपासून ते चार हात दूरच राहिले. आपल्या फटकळ स्वभावामुळे त्यांनी खूप जणांना दुखावले. पण जेव्हा यातील धोके त्यांच्या लक्षात आले, तेव्हा त्यांनी स्वतःला बदलवले. वरिष्ठांशी आपुलकीचे वागणे दिसू लागले, कार्यकर्त्यांच्या खांद्यावर त्यांचा हात आला. पक्षाच्या कार्यक्रमात, आंदोलनात ते अग्रभागी राहू लागले. आणि त्यांच्या भोवतीचे 'मोहोळ' वाढू लागले.
आपल्या झालेल्या चुका मोठ्या मनाने जाहीरपणे सांगून, सध्या विशाल दादांनी, डॉ. विश्वजीत कदम यांच्या विमानात को-पायलट ची जबाबदारी स्वीकारली आहे. यावरही ते टीकेचेच धनी बनले. आताही काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी मिळू नये यासाठी कोणी कोणी प्रयत्न केले हे जगजाहीर आहे.
आणि म्हणूनच स्व. वसंतदादांवर व त्यांच्या घराण्यावर निस्वार्थपणे प्रेम करणाऱ्या असंख्य हितचिंतकांना, आता विशाल दादांनी कोणत्याही परिस्थितीत माघार घेऊ नये असेच वाटते. जर विशाल दादांना काँग्रेस पक्षाचे तिकीट मिळू शकले नाही तर स्वाभिमानाने अपक्ष म्हणून लढावे. काँग्रेसवर प्रेम करणारेच नव्हे, तर स्वाभिमानी मतदारही त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहील या शंका नाही.