Sangli Samachar

The Janshakti News

'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय' नरेंद्र मोदी| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि.२९ एप्रिल २०२४
सध्या देशभरात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. देशातील राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. तर अनेक पक्ष आपला जाहीरनामा, सभा, प्रचार दौरे करत आहेत. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूज18 ग्रुपला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी त्यांचे पुढचे ध्येय काय आहेत.

या मुलाखतीवेळी लोकांचा वीज आणि वाहतुकीवर होणारा खर्च शून्यावर आणण्याचा आपला प्रयत्न असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. केंद्रात तिसऱ्यांदा सरकार स्थापन केल्यास भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याला आपले प्राधान्य असेल, असेही ते म्हणाले. न्यूज18 ला दिलेल्या खास मुलाखतीत पंतप्रधानांनी या गोष्टी सांगितल्या. प्रत्येक घराच्या छतावर सोलर पॅनल लावावेत, असेही त्यांनी सांगितले आहे.

मोदींनी तीन गोष्टींना दिलं प्राधान्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "मला तीन गोष्टी हव्या आहेत. पहिली, प्रत्येक घराचा वीज खर्च शून्य झाला पाहिजे. दुसरी, अतिरिक्त वीज विकून पैसे कमवले पाहिजेत. तिसरे, आपल्याला ऊर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भर व्हायचे आहे." इलेक्ट्रिक वाहने येतील. घराघरात अक्षय उर्जेरिन्यूएबल एनर्जी (Renewable Energy)ची सुविधा मिळाल्याने सर्वसामान्य नागरिक पेट्रोल आणि डिझेलवर पैसे खर्च करण्याऐवजी घरी स्कूटर आणि कार चार्ज करू शकतील, असे ते पुढे म्हणाले.


भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचे ध्येय

अक्षय ऊर्जेचे फायदे सांगताना पंतप्रधान म्हणाले की, अक्षय ऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराने पर्यावरण स्वच्छ राहील. यामुळे पेट्रोलियम पदार्थांच्या आयातीवर कोट्यवधी डॉलर्सची बचत होणार आहे. तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर त्यांचे सरकार भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवेल. प्रत्येक क्षेत्रात आधीपासून राबवलेले धोरण यापुढेही कायम राहणार असल्याचे ते म्हणाले.

भारत देखील उत्पादन आणि स्टार्टअप हब बनेल

जगातील भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीचे वर्णन करताना मोदी म्हणाले, "मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात आम्ही 11 व्या क्रमांकावर होतो. खूप प्रयत्नांनंतर आम्ही ती 5 व्या स्थानावर आणली. आता आम्ही आणखी प्रयत्न करू आणि देशाला तिसऱ्या क्रमांकावर नेऊ, म्हणूनच प्रत्येक क्षेत्रात आमचे धोरण चालू ठेवायचे आहे. आपले सरकार येत्या पाच वर्षांत भारताला स्टार्टअप हब, मॅन्युफॅक्चरिंग हब आणि इनोव्हेशन हब बनवण्याचा प्रयत्न करेल.