Sangli Samachar

The Janshakti News

कोकणचा राजाला 'हापूस' हे नाव कसं पडलं ?| सांगली समाचार वृत्त |
देवगड - दि.२८ एप्रिल २०२४
आंबा हा प्रत्येकाचा जीव की प्राण, आणि जर तो कोकणातला हापूस असेल तर कमालच.. फळांचा राजा म्हणून हापूस आंब्याला ओळखलं जातं. उन्हाळा सुरु झाला की लोकांना आंब्याची चाहूल लागायला सुरु होते. आंबा असा विचार जरी केला किंवा बघितला तरी नजरेसमोर तर रसाळ, केशरी, पिवळसर असा ‘हापूस आंबा’ दिसायला लागतो. ह्यातच कोकणातील हापूस हा भारतासह जगभरात प्रसिद्ध आहे. पण भारतासह परदेशात प्रसिद्ध झालेल्या ह्या राजाला ‘हापूस’ हे नाव ठेवलं तरी कोणी ? हा शब्द मराठी भाषेत आला तरी कुठून ? चला तर मग जाणून घेऊया ‘हापूस’ राजाची रंजक कहाणी

महाराष्ट्रात आंब्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन आहे. देवगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रायगडसह विविध राज्यांमध्ये आंब्याच्या बागा आहेत. पण विशेष म्हणजे कोकणातील विशेषतः देवगड,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आंब्यांची मोठ्या प्रमाणात लागवड होत असते. याच भागातून मोठ्याप्रमाणात आंबे मुंबईसह परदेशात विकण्यासाठी जात असतात. अशातच आंब्याला ‘हापूस’ हे नाव कसं पडलं, हे आपणा सर्वांना पडलेलं कोडं...


आंब्याचं 'हापूस' या नावाने बारसं केलं तरी कोणी ?

‘मनसोक्त आंबा खावा तर तो फक्त हापूसच. हापूसची चव दुसऱ्या कोणत्याच आंब्याला येणार नाही’ असं वाक्य सर्वांच्याच तोंडातून ऐकायला मिळत. हापूस नावावरून एक मराठी चित्रपट सुद्धा आला होता. पण आंब्याचं बारसं केलं तरी कोणी ? कुठून हे नाव आंब्याला मिळालं ? याचा शोध लावला गेलाय तो म्हणजे पोर्तुगीजांनी. प्रथमच भारतात या जातीचा आंबा पोर्तुगीजांनी लावला आणि तो सुद्धा गोव्यात. आणि तिथूनच तो कोकणभर पसरला आणि आता तर साऱ्या जगभर पसरलाय. ‘अल्फोन्सो' हे आंब्याचं मूळ नाव होत. जे पोर्तुगीज भाषेतलं आहे. पण काही कालांतराने त्याच अपूस झालं आणि मग आपल्या महाराष्ट्रात येईपर्यंत तो झाला हापूस…. ह्यामध्ये देवगड हापूस आंब्याने सर्व जगात जास्त नाव कमावलं. देवगडचा हापूस एवढा महाग विकला जातो की सर्वसामान्य लोकांना विकत घेणं परवडत नाही.

बाजारपेठांमध्ये विकण्यासाठी गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, तेलंगणा अशा वेगवेगळ्या राज्यांतूनही मोठ्याप्रमाणात आंबे येतात. पण हल्ली अनेक आंबा विक्रेते हापूसच्या नावाने लोकांना येडं बनवतात. पण शेवटी हापूस तो हापूसच. हापूसची चव, पिवळसर रंग, सुगंध कोणत्याच आंब्याला यायचा नाही. विशेतः हात धुतल्यानांतरही आंब्याचा सुगंध हातावर दरवळतो आणि जिभेवर मधुर अशी चव रेंगाळत असते. महाराष्ट्रात आंब्याच्या अधिक जाती आहेत. यात तोतापुरी, पायरी, गोवा माणकूर, नीलम, दशेरी, ओलूर, चुपायचे आंबे अशा आंब्यांचा समावेश आहे. पण तरीही हापूस तो हापूसच. कोणत्याच आंबोक हापूसची चव येत नसा.