Sangli Samachar

The Janshakti News

एक मराठी माणूस जेव्हा बिहारमधून तब्बल 4 वेळा खासदार होतो



सांगली समाचार - दि ८ एप्रिल २०२४
पटना - लोकसभा निवडणूक असो किंवा इतर कुठलीही निवडणूक, उमेदवाराची जिंकण्याची क्षमता पाहून तिकीट दिलं जातं. उमेदवार निवडताना मतदारसंघातील नेत्याला प्राधान्य देण्याची परंपरा आहे. मात्र, तुम्हाला असं सांगितलं की, महाराष्ट्रातील एक नेता त्याच्या जन्मगावापासून दीड-दोन हजार किलोमटर दूर असलेल्या ठिकाणाहून चारवेळा खासदार म्हणून निवडून आला होता, तर विश्वास बसेल? आजची स्थिती पाहता, यावर विश्वास बसणं अवघडच आहे.

पण पन्नास-एक वर्षांपूर्वी असं घडलं होतं. त्या नेत्याची ही गोष्ट.

ज्या नेत्याबद्दल तुम्ही मोठ्या उत्सुकतेनं वाचत आहात, ते म्हणजे मधुकर रामचंद्र लिमये उर्फ मधु लिमये. 1964 ते 1980 या काळात मधु लिमये चारवेळा बिहारमधून खासदार बनले. जातीय समीकरणं बळकट असलेल्या बिहारमधून मधु लिमये कसे खासदार बनले, हे आपण पुढे पाहूच. तत्पूर्वी, कुठल्याही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या मधु लिमयेंनी राजकारणात इतका पल्ला कसा गाठला, हे जाणून घेऊ.

मधु लिमयेंनी बालवयात दोन घटना पाहिल्या. एक म्हणजे धार्मिक दंगली पाहिल्या आणि दुसरं म्हणजे असहकार आंदोलनात पोलिसांचा लाठीमारही हसत हसत झेलणारे गांधींचे अनुयायीही त्यांनी पाहिले. या दोन्ही घटनांचा मधु लिमयेंच्या विचारसृष्टीवर मोठा परिणाम झाला. पुढच्या सार्वजनिक आयुष्यात त्यांनी जमातवादाला विरोध केला आमि सत्याग्रहावर निष्ठा ठेवली. बालवयातल्या या घटना मनावर कोरून घेणाऱ्या मधु लिमये तल्लख बुद्धीचे होते, हे त्यांच्या शैक्षणिक कामगिरीवरून लक्षातही येते.

1 मे 1922 रोजी जन्मलेल्या मधु लिमयेंचे वडील पेशाने शिक्षक होते. शिक्षण त्यांच्या घरात रुजलेलं होतं. मुंबईच्या रॉबर्ट मनी हायस्कूलमध्ये आणि नंतर पुण्याच्या सरस्वती मंदिर शाळे त्यांनी शिक्षण घेतलं. पाचवी, सहावी आणि सातवी या तिन्ही इयत्ता त्यांनी एकाच वर्षात दिल्या. वयाच्या 13 व्या वर्षी ते मॅट्रिकची परीक्षा देण्यासाठी तयार होते, मात्र शिक्षण विभागानं नकार दिला.

पुढे 1937 साली मॅट्रिक पूर्ण केल्यानंतर ते पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये कला शाखेत दाखल झाले. पुण्यास समाजवादी नेते एस. एम. जोशींची भेट घेतली आणि ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे सदस्य बनले. त्यांच्या सार्वजनिक आयुष्याचा हा प्रवेश ठरला.

RSS सोबत संघर्षाची सुरुवात

1 मे 1937 रोजी कामगार दिनानिमित्त पुण्यात कामगार दिनानिमित्त मिरवणूक निघाली होती. या मिरवणुकीत एस. एम. जोशी, सेनापती बापट, ना. ग. गोरे अशी मंडळी होती. मधु लिमये तेव्हा 15 वर्षांचे होते. या मिरवणुकीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी हल्ला केला. त्यात एस. एम. जोशी जखमी झाले होते. या घटनेनंतर मधु लिमयेंचा संघाच्या विचारसरणीशी पटलं नाही आणि संघर्षही होत राहिला.

पुढे जनता पक्षाचा प्रयोग झाला आणि मोरारजी देसाई भारताचे पंतप्रधान बनले, तेव्हा मधु लिमयेंनीच 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनता पार्टी अशा दोहोंचे सदस्य कुणी असू नये' असं म्हणत द्विसदस्यत्वाचा मुद्दा उपस्थित केला. त्यातूनच पुढे जनता पार्टीचं सरकार कोसळलं.

राजकीय कारकीर्द

पुढे साने गुरुजींच्या संपर्कात आले आणि 1938 सालापासून संपूर्णपणे देशकार्याला वाहून घेण्याचं ठरवलं. लिमयेंची ध्येयनिष्ठा पाहून एस. एम. जोशींनी त्यांना पुणे जिल्हा काँग्रेस सोशलिस्ट पक्षाचे सरचिटणीस म्हणून नेमलं. लिमये तेव्हा 17 वर्षांचे होते. ही त्यांची सक्रीय राजकारणाची सुरुवात होती. पुढच्याच वर्षी दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली आणि मधु लिमयेंनी युद्धविरोधी भाषण केलं, त्यामुळे त्यांना अटक झाली. वय होतं 18 वर्षे. इथून त्यांच्या तुरुंगवाऱ्या सुरू झाल्या. धुळ्याच्या तुरुंगात त्यांची रवानगी झाली. तिथं साने गुरूजी आणि लिमये एकत्रच होते. तेव्हा साने गुरुची कम्युनिस्ट प्रभावाखाली होते. लिमयेंच्या मांडणीने प्रभावित होत, साने गुरूजीही कम्युनिस्ट विचारांच्या प्रभावातून बाहेर पडले आणि समाजवाद्यांच्या जोडीला आले.

1942 सालीही त्यांना अटक झाली. कारण ठरलं 'क्रांतिकारी' नावाचं मासिक. हे मासिक त्यांनी भूमिगत असताना चालवलं. पुढे भारताच्या स्वातंत्र्यानंतर मधु लिमये समाजवादी विचारसरणींच्या पक्षांमध्येच राहिले. त्यांनी पक्ष बदलले, मात्र विचारधारा समाजवादी राहिली. मधु लिमयेंचं राजकारण जवळून पाहिलेले पत्रकार सांगतात, संसदेतील लोकसभेच्या सभागृहात हा माणूस शिरल्यानंतर सत्ताधारी बाकांवरील नेत्यांना घाम फुटत असे, की आज कुणाला धारेवर धरणार? 'बुद्धिबळ' खेळण्यात पटाईत असलेला हा नेता भलभल्यांना आपल्या शब्दांनी पुराव्यानिशी गारद करत असे. बिहारच्या राजकीय इतिहासाबद्दल जेव्हा जेव्हा बोललं जातं, तेव्हा मधू लिमये या महाराष्ट्रातील नेत्याचं नाव आवर्जून घेतलं जातं. खरंतर त्याशिवाय बिहारचा राजकीय इतिहास अपूर्णच राहील.

बिहारमधून तब्बल चारवेळा खासदार

मधू लिमये हे मूळचे पुण्याचे, मात्र चारवेळा खासदार झाले तेही बिहारमधून. महाराष्ट्रातील मूळचा मराठी माणूस अशाप्रकारे इतर राज्यातून खासदार झाल्याची अशी क्वचित उदाहरणं आहेत. राज्यसभेवर इतर राज्यातून गेलेले बरेच नेते सापडतील, मात्र इतर राज्यातून लोकांमधून निवडून तब्येत चार वेळेला लोकसभेत गेलेल्या नेत्यांची नावं फार नाहीत. मधू लिमये अशा मोजक्या नेत्यांपैकी एक आहेत.