yuva MAharashtra मातृभाषेतून तंत्रशिक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध!

मातृभाषेतून तंत्रशिक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध!



सांगली समाचार - दि. १२ मार्च २०२४
मुंबई - अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, महाराष्ट्र व सृजन ट्रस्ट आयोजित ३३ व्या 'डिपेक्स'चा समारोप रविवार, दि. १० मार्च रोजी नवी मुंबईतील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर झाला. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. संशोधनातील नाविन्यता वाढविण्यासाठी महाराष्ट्रात मातृभाषेतून तंत्रशिक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमादरम्यान मंचावर इस्रोचे संचालक ए. राजाराजन, अजंठा फार्माचेचे उपाध्यक्ष मधुसुदन अग्रवाल, अभाविपचे राष्ट्रीय महामंत्री याज्ञवल्क्य शुक्ल, स्वागत समिती अध्यक्ष सुरेश हावरे, कोंकण प्रदेश अध्यक्ष श्रीकांत दुदगीकर, कोंकण प्रांत मंत्री संकल्प फळदेसाई, सृजन न्यासाचे विश्वस्त आशिष उत्तरवार, कोंकण प्रदेश तंत्र शिक्षण विद्यार्थी कार्य संयोजक श्रेया कणसे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान 'डिपेक्स २०२४' च्या विजेत्यांचा बक्षीस वितरण समारोहदेखील पार पडला.

 
चंद्रकांतदादा पाटील पुढे म्हणाले, 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अभिप्रेत असल्याप्रमाणे महाराष्ट्रात येत्या शैक्षणिक वर्षापासून अभियांत्रिकेचे शिक्षण मातृभाषेत देण्यात येणार आहे. संशोधनाचा विचार मातृभाषेत अधिक चांगल्या पद्धतीने केला जातो. डिपेक्समधील संशोधन प्रकल्पामुळे अनेक नागरिकांना मदत झाली आहे, याचे अनेक उदाहरणे आज समाजामध्ये उपलब्ध आहेत.'


अभाविपचे राष्ट्रीय महामंत्री याज्ञवल्क्य शुक्ल म्हणाले की, 'राष्ट्र उभारणीत युवकांची मोठी भूमिका आहे. देशातील युवक हे देशाच्या विकासासाठी व प्रगतीसाठी विचार करत आहेत. डिपेक्स नव संशोधकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारी चळवळ आहे. ३८ वर्षांपूर्वी संशोधनाला प्रोत्साहित करण्यासाठी भविष्याचा वेध घेऊन डिपेक्स उपक्रमाची सुरुवात केली गेली.'

इस्रोचे संचालक ए. राजाराजन म्हणाले की, 'युवकांनी उद्योगांची आवश्यकता लक्षात घेऊन संशोधन केले पाहिजे. पुरातन काळापासून भारतीय ज्ञानसंपदा प्रगत होती, खगोलशास्त्र, स्थापत्यशास्त्र अशा विविध विषयात भारत जगाला दिशादर्शक होता. परंपरा व तंत्रज्ञानाची सांगड घालून युवकांनी शैक्षणिक क्षेत्रात संशोधन करावे असे वाटते.'

अजंठा फार्माचे चे उपाध्यक्ष मधुसुदन अग्रवाल म्हणाले की, 'डिपेक्स हे उद्योग व शैक्षणिक संस्थान यांचे संयुक्त संगम आहे. विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राचे दार खुले करण्याचे काम अखिल भारतीय विद्यार्थी परिषद डिपेक्सच्या माध्यमातून करत आहे.'

समारोप कार्यक्रमाचे प्रास्ताविक सृजन न्यासाचे विश्वस्त आशिष उत्तरवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोकण प्रदेश अध्यक्ष श्रीकांत दुदगीकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन कोंकण प्रदेश मंत्री संकल्प फळदेसाई यांनी केले. आय.टी.आय. ते आय.आय.टी. या संकल्पनेतून डिपेक्स २०२४ स्पर्धेमध्ये २७४ शोध प्रकल्प सहभागी झाले होते. विविध १० प्रकरांमध्ये हे शोध प्रकल्प विभागलेले होते. डिपेक्स २०२४ ला नवी मुंबई व परिसरातील विद्यार्थी, विद्यार्थिनी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामध्ये सुमारे ४ हजारहून अधिक नागरिकांनी ७ ते १० या कालावधीत येथील विविध शोध प्रकल्पांना भेट दिली.