Sangli Samachar

The Janshakti News

प्रवास अवकाशाच्या वेध घेणा-या दुर्बिनीचासांगली समाचार - दि. १० मार्च २०२४
नवी दिल्ली - कित्येक अब्ज दूर असलेल्या सूर्यमालेतील ग्रहांना नजीकच्या अंतरावर असल्याप्रमाणे पाहणं, त्यांचा अभ्यास करणं, त्यांच्यातील बदल टिपणं हे शक्य झालं ते केवळ एका महत्त्वाच्या शोधामुळे. नेदरलँडमधील हॅन्स लिपरशे नावाच्या एका चश्मा बनवणाऱ्या व्यक्तीने दोन भिंग वापरून दूरवरच्या गोष्टी मोठय़ा करून कशा पाहाव्यात ते सांगितलं. पुढे प्रयोग म्हणून या दुर्बिणीचा खरा उपयोग साधारण एका वर्षाने गॅलिलिओने केला. दुर्बिणीच्या रचनेत सुधारणा करून त्याने पहिल्यांदाच आकाशाकडे ती रोखली आणि त्यातून त्याला जे दिसले त्यामुळे ब्रह्मांडाविषयी असलेली आपली कल्पना साफ बदलली!

अंतराळाच्या विशाल विस्तारामध्ये कित्येक अब्ज दूर असलेल्या एक सूर्यमालेतील पृथ्वीसारख्या ग्रहाला आपण शोधू शकतो का? 500 वर्षांपूर्वी जर कोणी हा प्रश्न विचारला असता तर तत्कालीन खगोल अभ्यासकांनी चटकन नाही असंच म्हटलं असतं, पण साधारण 400 वर्षांपूर्वी अशी एक घटना घडली, ज्यामुळे आज आपण असे असंख्य इतर सूर्यमालेतील ग्रह शोधू शकलो! तर असं नक्की काय घडलं 400 वर्षांपूर्वी? माणसाने असं कुठलं साधन तयार केलं की, इतक्या दूर असलेला एक छोटासा ग्रह आपण इतक्या सहजतेने आता शोधू शकतो? याचं उत्तर म्हणजे दुर्बीण !


खरं तर दुर्बिणीचा शोध नक्की कधी लागला हे सांगणं कठीणच. साधारण 1608 मध्ये नेदरलँडमध्ये राहणाऱ्या हॅन्स लिपरशे नावाच्या एका चश्मा बनवणाऱ्या व्यक्तीने एक पेटंट सादर केले. त्यात त्याने दोन भिंग वापरून दूरवरच्या गोष्टी मोठय़ा करून कशा पाहाव्यात ते सांगितलं. लिपरशेला ते पेटंट काही मिळाले नाही, पण या शोधाची बातमी मात्र दूरवर पसरली. सुरुवातीच्या काळात दोन बहिवक्र भिंग वापरून दुर्बीण तयार करण्यात आली. दूरवरच्या गोष्टी सहज पाहू शकत असल्याने समुद्र प्रवासी त्याचा लगेच उपयोग करू लागले, पण दुर्बिणीचा खरा उपयोग साधारण एका वर्षाने गॅलिलिओने केला. दुर्बिणीच्या रचनेत सुधारणा करून त्याने पहिल्यांदाच आकाशाकडे ती रोखली आणि त्यातून त्याला जे दिसले त्यामुळे ब्रह्मांडाविषयी असलेली आपली कल्पना साफ बदलली !

जगातील बऱ्याच संस्कृतींमध्ये भूकेंद्रित ब्रह्मांडाची कल्पना होती. म्हणजेच आपल्याला ते काही आकाशात दिसते ते सर्व पृथ्वीभोवतीच फिरते असे सर्वांचे ठाम मत होते. खरं तर आपण रोज आकाश निरीक्षण केले तर आपल्यालाही तसेच वाटेल. कारण आपण रोज पूर्वेला सूर्य उगवताना पाहतो आणि पश्चिमेला मावळताना. मग परत साधारण 12 तासांनंतर सूर्य पूर्वेलाच उगवतो. रात्रीच्या आकाशातील तारेसुद्धा हेच चक्र पाळतात. या निरीक्षणावरून एकच भासते की, सर्व तारे, सूर्य, चंद्र आणि इतर ग्रह पृथ्वीभोवतीच फिरत आहेत. पण साधारण 1543 मध्ये निकोलस कोपर्निकस या गणितज्ञ आणि खगोल अभ्यासकाने पृथ्वी व इतर ग्रह सूर्याभोवती फिरत आहेत असे सांगितले. तत्कालीन विद्वानांनी या कल्पनेचा चांगलाच विरोध केला. मात्र गॅलिलिओने आपल्या दुर्बिणीच्या सहाय्याने या कल्पनेला दुजोरा दिला. त्याने आपल्या दुर्बिणीतून चंद्रावरचे खड्डे, सूर्यावरचे डाग या सर्वच गोष्टी पाहिल्या, पण सूर्यकेंद्रित ब्रह्मांडाची कल्पना पटवून देण्यासाठी दोन निरीक्षणे पोषक ठरली. पहिलं निरीक्षण म्हणजे शुक्राच्या दिसणाऱ्या कला आणि दुसरे म्हणजे गुरूभोवती फिरणारे त्याचे चार चंद्र!

नुसत्या डोळ्यांनी शुक्र कायमच खूप ठळक आणि तेजस्वी दिसतो. कधी संध्याकाळी सूर्यास्तानंतर तर कधी सूर्योदयाच्या आधी पहाटे! पण हाच शुक्र जर आपण रोज दुर्बिणीतून पाहिला तर आपल्याला त्याच्या कला दिसू शकतात. इतर ग्रहांच्या तुलनेत फक्त शुक्राच्याच कला का दिसतात याचे उत्तर फक्त सूर्यकेंद्रित ब्रह्मांडाची कल्पनाच देऊ शकते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, चंद्र तर नक्कीच पृथ्वीभोवती फिरतो आणि त्याच्या पण कला दिसतात. मग शुक्राच्या कला पाहून तो सूर्याभोवती फिरतो हे कसं काय आपण म्हणू शकतो? गॅलिलिओने जेव्हा शुक्राच्या सर्व कला पाहिल्या तेव्हा त्याला जाणवले की, शुक्राचे आकारमान कलेनुसार बदलत जाते. वर दिलेले चित्र गॅलिलिओने स्वत काढलेले आहे. त्यात त्याने पाहिलेल्या शुक्राच्या कला त्याच्या आकारमानाप्रमाणे दाखवलेल्या आहेत. शुक्राच्या कक्षेच्या आकृतीत तुम्ही पाहू शकता की, जेव्हा पृथ्वीपासून दूर शुक्र सूर्याच्या पाठीमागे जातो तेव्हा त्याची कला पूर्ण असते, पण तो पृथ्वीपासून दूर असल्याने त्याचे आकारमान कमी भासते. याउलट तो पृथ्वीच्या जवळ आला की, त्याचे आकारमान वाढते. जर शुक्र पृथ्वीभोवतीच फिरत असता तर त्याचे आकारमान इतक्या प्रमाणात बदलले नसते!

गॅलिलिओने गुरूच्या चार प्रमुख चंद्रांचे निरीक्षणसुद्धा केले. त्याला ते चारही चंद्र गुरूभोवती फिरतात हे जाणवले. त्यातून कोपर्निकस सिद्धांत खरा असल्याची पावती मिळाली. गॅलिलिओने वापरलेली दुर्बीण ही अपवर्तक (रिफ्रॅक्टर) होती. त्यात प्राथमिक भिंग बहिवक्र होते, तर ज्या बाजूने आपण पाहतो ते भिंग अंतवक्र होते. या दुर्बिणीची आवर्धक शक्ती नऊपट होती. गॅलिलिओच्या अग्रगण्य कार्यानंतर कालांतराने दुर्बिणीच्या रचनेत लक्षणीय प्रगती झाली. 17 व्या शतकात जोहान्स केप्लर आणि आयझॅक न्यूटनसारख्या खगोलशास्त्रज्ञांनी दुर्बिणीच्या रचनेमध्ये सुधारणा करून भिंगाच्या जागी अधिक अत्याधुनिक आरशांचा वापर केला. 1668 मध्ये न्यूटनने परावर्तित दुर्बिणीचा लावलेला शोध प्रकाशशास्त्राच्या इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण ठरला.