सांगली समाचार - दि. २७ मार्च २०२४
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि निसर्गाचा चमत्कार मानल्या गेलेल्या राजापूरच्या गंगेचे २४ मार्च २०२४ रोजी सकाळी आगमन झाले आहे. सर्वसाधारणपणे दर तीन वर्षांनी राजापूरची गंगा प्रकट होते असे मानले जाते. राजापूरच्या गंगेची माहिती सांगायची झाल्यास साधारणत: मीन राशीत सूर्य असताना, एप्रिल, मेमध्ये ती बहुदा येते. उन्हाळ्याजवळच्या डोंगरावर असलेल्या त्या गंगास्थानावर जेव्हा ती प्रचंड वेगाने गोमुखातून धबाबा वाहत असते, तो फवारा अंगावर सहज घेववत नाही. मूळ गंगा वाहते ती एका पवित्र वृक्षाच्या मुळाशी असलेल्या उगम स्थानातून. याचवेळी वीस पंचवीस पावलांवर काशी कुंडात मोठ्या प्रमाणावर गंगा येत रहाते. त्याला संलग्न गोमुखाखाली भक्तगण सचैल स्नान करतात. मूळ गंगा उगमाच्या समोर विविध आकाराची अन्य बारा कुंडे आहेत. वरुण कुंड, हिम कुंड, वेदिका कुंड, नर्मदा कुंड, सरस्वती कुंड, गोदा कुंड, यमुना कुंड, कृष्णा कुंड, अग्निकुंड, बाण कुंड, सूर्य कुंड व चंद्र कुंड. एकूण चौदाही कुंडांतील पाण्याचे तापमानही त्या त्या देवतेनुसार विविध तापमान दर्शविणारे आहे.
सूर्य कुंडातला उबदारपणा व चंद्र कुंडातील आल्हाददायक जलस्पर्श जाणवण्यासारखा असतो. सह्याद्री खंडामध्ये शिव-पार्वंती संवादातून धूतपापेश्वर हे राजापुरमधील पवित्र शिवस्थान व समस्त तीर्थांचा हा समुहप्रवाह याचे यथास्थित वर्णन आहे. मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिणेला राजापूर नावाचं रम्य गाववजा शहर आहे. राजापूरवरून गोव्याकडे जाताना अर्जुना नदीवरचा पूल आणि नंतरचा छोटा घाट ओलांडल्यावर (शहरापासून तीन-साडेतीन किलोमीटरवर) जवळच उन्हाळे नावाचे बारमाही वाहणारे तीर्थ आहे. हे तीर्थ ज्वालानाथ नामक एका योग्याला लागलेला शीतज्वर घालविण्यासाठी सुरू झाले. शके १५००, सन १५७८ ला हे घडल्याची नोंद सापडते. यानंतर काही वर्षांनी स्थानिक शेती व्यवसायात रमणारा गंगाजी साळुंखे नामक एक भाविक या गंगोत्थानास कारण ठरला असे म्हणतात. तो प्रतिवर्षी शेतीचे दिवस आटोपल्यानंतर तीर्थ स्नानासाठी प्रयागला जात असे.
क्वचित पंढरपुरच्या भागिरथी तीर्थाचाही उल्लेख आढळतो. सलग बारा वर्षे या राखलेल्या उत्तम क्रमानंतर तेराव्या वर्षी त्याला जाववेना. म्हणून उन्हाळ्याच्या तीर्थात स्नान करून तो या स्थळी असलेल्या शेतात बसला होता. नुकतीच मळणी झालेली असल्याने कोंडाही इतस्तत: पसरला होता. अशावेळी काय घडले? वर्णन सांगते - 'कुळंब्याचे भक्तिस तीर्थ धावले. श्रीमुख संवत्सरी, पौष शुद्ध दशमीसह एकादशी, या मुहूर्तावर मध्यान्ही तिवडेखाली सांवावरी कोंडायुक्त बारा ठायी, बारा झरे सुटले. ही घटना सन १५९१ ला घडली असावी. कारण हे तीर्थ सलग सात वर्षे वाहत होते आणि सन १५९८ ला श्रीशैलचा राजा प्रतापरूद्र येथे साशंकतेने काही विधान करताच ते असे थांबले की जेवायला बसलेल्या राजाला हात धुण्यासाठी किलोमीटरभर उन्हाळ्याला यावे लागले. त्यानंतर बारा दिवसांनी ती प्रार्थनापूर्वक पुन्हा प्रकटली! सन १६६१ला छत्रपती शिवराय येथे आले होते. त्यांनी राजापूरच्या वखारीला खणती लावली तेव्हा गंगामाता वाहतच होत्या. गंगामातेने हिंदवी स्वराज्य संस्थापकांस तीर्थाभिषेकाने तोषविले! कविवर्य मोरोपंत शके १७११, सन १७८९ ला वयाच्या ६० वर्षी येथे गंगास्नानार्थ आले होते. सन १८०० च्या आधी पुण्याचे मुनीश्वर आणि काशीकर हे दोन भक्त आपल्या सद्गुरु यतीराजांसमवेत दक्षिणेत शिवचिदंबर स्वामींकडे जाण्याआधी राजापुरला गंगेवर आले. यतीमहाराजांनी शिवाचा जयजयकार करताच ती शिवजटोद्भवा खळाळून बाहेर येत श्रीचरणांशी खेळू लागली. हे यतिराज म्हणजे श्रीस्वामी समर्थ महाराजच होत!
उन्हाळ्याच्या जवळच्या सरदार खासगीवालेंच्या टोलेजंग घरवजा वाड्यात श्रीस्वामी पादुकांचे स्थान असून हे स्वामीमहाराजांचे अगदी राहते घर आहे जणू! या पादुकास्थापनेच्या वेळी महाराज अचानक धुपदीपांच्या उजाळ्यात चमकून गेले होते. महाराज येथेही आल्याचे वृत्त स्वामीभक्तास खरेच लुभावणारे ठरावे! शिवाजी महाराजांनी दोनदा गंगास्नान केल्याच्या नोंदी आहेत . १६६१ साली इंग्रजांची राजापूर येथील वखार लुटल्यावर शिवाजी महाराजांनी गंगास्नान केले होते . तसेच १६६४मध्ये गागाभट्टांनी येथे घेतलेल्या ब्राह्माणसभेच्या वेळीही महाराज गंगास्नानाला आले होते . उन्हाळ्याच्या थोडेसे पुढे पांगऱ्यांचे शिवानंद स्वामी टेंबे महाराजही स्वामीपरंपरेतील! राजापूरचे धूतपापेश्वराकडील पुराणिक महाराजही स्वामीपरंपरेचे वैभव गाणारे. तसेच स्वामीसुतांबरोबरच्या ब्रह्मचारीबुवांनी आणलेल्या पादुका खासगीवाल्यांच्या वाड्यात आहेत आणि विशेष म्हणजे गंगामुखाजवळही असेच एक पादुकांचे स्थान असून ते स्वामी महाराजांशी संबंधित आहे. श्रीदत्तस्थान म्हणून ते सुपरिचित आहेच.