Sangli Samachar

The Janshakti News

विकसित भारताचे स्वप्न अद्यापही कोसो दूर ; रघुराम राजन यांचे मतसांगली समाचार - दि. २७  मार्च २०२४

नवी दिल्ली : '' भारत २०४७ पर्यंत विकसित देश होऊ शकत नाही याबाबत बोलणे देखील मूर्खपणा ठरेल. देशातील अनेक मुले आजही उच्चशिक्षणापासून वंचित असून शाळांतून होणाऱ्या गळतीचे प्रमाण देखील अधिक आहे,'' असे प्रतिपादन भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी 'ब्लूमबर्ग'ला दिलेल्या मुलाखतीत केले. देशाच्या आर्थिक विकासाबाबत उगाच बढाई मारून आपण खूप मोठी चूक करत आहोत. आपल्याला खरोखरच काही ठोस प्राप्त करायचे असेल तर आधी काही मोठ्या समस्यांचे निराकरण करावे लागेल. मनुष्यबळाला उत्तम शिक्षण देऊन त्यांच्यातील कौशल्याचा विकास घडवून आणणे हेच सर्वांत मोठे आव्हान असल्याचे राजन यांनी स्पष्ट केले.

राजन म्हणाले की, '' चुकीच्या गृहितकांवर विश्वास ठेवून भारत मोठी चूक करू शकतो. सध्या जे वलय निर्माण केले जात आहे ते प्रत्यक्षात येण्यासाठी देखील खूप मेहनत करावी लागली आहे. जनतेने एखाद्या विशिष्ट वलयावर विश्वास ठेवावा, असा राजकीय नेत्यांचा आग्रह असतो. भारताने जर अशा गृहितकांवर विश्वास ठेवला तर ती एक गंभीर चूक ठरू शकते.''

त्याकडे मात्र दुर्लक्ष

केंद्र सरकार चीपनिर्मिती उद्योगावर लक्ष केंद्रित करत आहे त्याबाबत बोलताना राजन म्हणाले, '' देशाला महान राष्ट्र बनविण्याची सरकारची महत्त्वाकांक्षा खरी आहे पण त्यासाठी काय करायला हवे ही मात्र वेगळी गोष्ट आहे. सध्या आपण प्रतिष्ठेच्या उद्योगांवरच थांबलो आहोत हीच माझ्यासाठी खरी चिंतेची बाब आहे पण हे सगळे काही त्या उद्योगाच्या वाढीसाठी चिरंतन ठरेल का? याकडे मात्र आपण पूर्णपणे दुर्लक्ष करत आहोत.'' रघुराम राजन यांनी यापूर्वीही भारताच्या विकासाबाबत केलेल्या दाव्यांवर टीका केली होती.

चीनकडून काय शिकायला हवे

आपल्याला काय हवे? हा एक व्यावहारिक विचार आहे असे सांगत राजन यांनी चीनचे माजी नेते डंग शाओपिंग यांच्या विधानाचा दाखला दिला. '' डंग यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, भारताने चीनकडून काय शिकायला हवे तर मांजर काळे असो अथवा पांढरे याचा काही फरक पडत नाही ते उंदीर पकडते की नाही हा खरा प्रश्न आहे.''