yuva MAharashtra दररोज 'आरओ' चं शुद्ध पाणी पिता? फायद्या ऐवजी होईल नुकसान, ऐका तज्ज्ञांचा सल्ला

दररोज 'आरओ' चं शुद्ध पाणी पिता? फायद्या ऐवजी होईल नुकसान, ऐका तज्ज्ञांचा सल्ला



सांगली समाचार  - दि. २९ मार्च २०२४
नवी दिल्ली - पाणी हे जीवन आहे असं आपण नेहमीच म्हणतो. शरीराचं चलनवलन नीट राखायला पाणी आवश्यक आहे हे खरं असलं तरी त्याची खरी किंमत मात्र आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसांत कळते. उन्हात बाहेर जाऊन आल्यानंतर एक ग्लास पाणी प्यायल्यानंतर जो थकवा गायब होतो त्याचं वर्णन करणं अशक्य. अलीकडे शुद्ध पाण्यासाठी अनेक ठिकाणी 'आरओ फिल्टर' चा वापर वाढला आहे. पण अशा फिल्टरमध्ये शुद्ध केलेलं पाणी खरंच शरीरासाठी गुणकारी असतं का?
'आरओ फिल्टर' चं पाणी शरिरासाठी सर्वोत्तम असं तुम्हाला वाटत असेल तर ही माहिती महत्त्वाची आहे. पाणी अतिशुद्ध असणं आपल्या तब्येतीसाठी हानिकारक असू शकतं. 'आरओ फिल्टर' घेताना पाण्यात विरघळणाऱ्या एकूण घनपदार्थांचं प्रमाण 200 ते 250 मिलिग्रॅम प्रतिलिटर असणं आवश्यक आहे. त्यामुळे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि इतर खनिजं त्यात शिल्लक राहतील.

अलीकडेच 'आरओ' तंत्रज्ञान विषयक एका वेबिनारमध्ये मुख्य शास्त्रज्ञ डॉ. अतुल व्ही. मालधुरे यांनी सांगितलं की पिण्याच्या पाण्यातील दूषित घटकांबरोबरच आरओद्वारे आवश्यक खनिजंही नष्ट केली जाऊ शकतात. जागतिक आरोग्य संघटनेकडून (डब्लूएचओ) सुद्धा 'आरओ फिल्टर' च्या वापराबाबत इशारा देण्यात आला आहे. पाणी शुद्ध करण्यासाठी 'आरओ फिल्टर' अत्यंत उपयुक्त आहेत मात्र या प्रक्रियेत अनेकदा कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखी पाण्यातील उपयुक्त खनिजंही नष्ट होतात. शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात असं डब्लूएचओने 2019 मध्ये स्पष्ट केलं होतं. त्यामुळेच 'आरओ फिल्टर' मधून शुद्ध केलेलं पाणी दीर्घ काळ पिणं आरोग्यासाठी चांगलं नाही.


दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयातील पोट आणि आतड्यांच्या आजारांवरील उपचारतज्ज्ञ डॉ. अनिल अरोरा म्हणाले, 'आरओ फिल्टर' ऐवजी गाळून उकळून गार केलेलं पाणी आरोग्यासाठी चांगलं आहे. उकळण्याच्या प्रक्रियेत पाण्यातील जीवाणू आणि विषाणू तसेच बुरशी नष्ट होईल. झेकोस्लोव्हाकिया आणि स्लोव्हाकिया इथे पाच वर्षं 'आरओ' च्या पाण्याची सक्ती करण्यात आली होती. त्यानंतर खनिजांच्या कमतरतेमुळे नागरिकांच्या तब्येतींवर त्याचे काही परिणाम दिसल्याचं डॉ. अरोरा यांनी सांगितलं.

एक लिटर पाण्यात 30 मिलिग्रॅम कॅल्शियम, 30 मिलिग्रॅम बायकार्बोनेट आणि 20 मिलिग्रॅम मॅग्नेशियम असावं अशी शिफारस डब्लूएचओ करतं. मेदांता रुग्णालयाच्या डॉ. अश्विनी सेठिया यांनी 'टाईम्स ऑफ इंडिया' ला दिलेल्या माहितीनुसार 'आरओ' मधील पाणी शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत जीवाणू, विषाणू आणि बुरशीजन्य घटक नष्ट होतात, मात्र आवश्यक खनिजंही अनेकदा पाण्याबाहेर जातात. त्यामुळे सुती कापडात गाळून 20 मिनिटांपर्यंत उकळलेलं पाणी हे पिण्यासाठी सर्वोत्तम असू शकतं. पिण्याच्या पाण्यातील खनिजांच्या कमतरतेमुळे केस गळणं, नैराश्य, हाडांचे विकार, चिडचिड, थकवा, अशक्तपणा अशा तक्रारी दिसू शकतात.