सांगली समाचार- दि. ५ मार्च २०२४
आतापर्यंत आपण सोनं, चांदी आणि हिऱ्याची तस्करी ऐकली आहे. आता चक्क केसांची तस्करी करणारं एक मोठं रॅकेट समोर आलं आहे. ईडीने 11 हजार 793 कोटी रुपयांच्या मानवी केसांच्या तस्करीचं रॅकेट प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. हे तीन पॉइंट कॉरिडॉरद्वारे सुरू असलेलं एक कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरण आहे.
केसांच्या तस्करीचं प्रकरण
म्यानमारमधील व्यापाऱ्यांकडून पैसा हैदराबादला कसा पाठवला जातो, याचा खुलासा झाला आहे. ही रक्कम अनेक खात्यांमधून जमा केली जात असल्याचं समोर आलं आहे. एकूण 11 हजार 793 कोटी रुपयांपैकी सुमारे 2,491 कोटी रुपये रोख स्वरूपात (21% पेक्षा जास्त) अशा खात्यांमध्ये जमा करण्यात आले आहेत. याप्रकरणी ईडीने फेब्रुवारी 2022 मध्ये देशभरात शोध घेतला. म्यानमारमधून केस निर्यात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार ED ने मोडस ऑपरेंडीचा पर्दाफाश केल्यानंतर कारवाई केली. 2021 मध्ये हैद्राबाद स्थित नायला फॅमिली एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध बेनामी आयात निर्यात कोड, तोतयागिरी आणि खोटेपणा केल्याबद्दल गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हैदराबाद विमानतळावरून म्यानमार, बांगलादेश, व्हिएतनाम आणि चीनमध्ये केसांची तस्करी होत असल्याचं समोर आलं आहे.