Sangli Samachar

The Janshakti News

"मैदान तुम्ही निवडा, मी चर्चेसाठी तयार आहे"; स्मृती इराणींनी राहुल गांधींना दिलं चॅलेंज
सांगली समाचार - दि. ५ मार्च २०२४
नागपूर - लोकसभा निवडणूक 2024 मुळे देशभरातील राजकारण तापलं आहे. याच दरम्यान, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. यूपीए सरकारने आणि मोदी सरकारने 10 वर्षात केलेल्या कामांमधील फरकावर चर्चा करण्याचं आव्हान स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना दिलं आहे. याशिवाय राहुल गांधी भाजपाच्या एका कार्यकर्त्यासमोरही टिकू शकणार नाहीत, असंही म्हटलं आहे.

नागपुरात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री म्हणाल्या की, "माझा आवाज राहुल गांधींपर्यंत पोहोचत असेल तर त्यांनी कान उघडून ऐकावे. नरेंद्र मोदी सरकार आणि यूपीए सरकार यांच्यात आतापर्यंत झालेल्या कामांवर चर्चा व्हायला हवी." याशिवाय, इराणी यांनी असा दावाही केला की, "जर मला राहुल गांधींशी चर्चा करायची असेल तर काँग्रेस नेते चर्चेत सहभागी होणार नाहीत."


स्मृती इराणी म्हणाल्या की, "मी गॅरंटी देते की, युवा मोर्चाचा कार्यकर्ताही राहुल गांधींसमोर बोलू लागला तर काँग्रेस नेत्याची बोलण्याची ताकद संपेल. गेल्या 10 वर्षात भाजपाने जाहीरनाम्यात दिलेली तीन मोठी आश्वासने पूर्ण केली आहेत. जाहीरनाम्यात कलम 370 हटवण्याचे, महिलांना विधिमंडळात आरक्षण आणि राम मंदिर उभारणीचे आश्वासन दिले होते आणि भाजपाने ते पूर्णही केले आहे."

भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपाने स्मृती इराणी यांना पुन्हा एकदा यूपीच्या हायप्रोफाईल मानल्या जाणाऱ्या जागेवर उमेदवारी दिली आहे. या जागेवर इराणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पराभव केला होता. मात्र, राहुल गांधी केरळमधील वायनाडमधून निवडणूक जिंकून संसदेत पोहोचले.