Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीत हळद दराचा पुन्हा विक्रमसांगली समाचार- दि. २७ मार्च २०२४
सांगली - गेल्या आठवड्यातील विक्रमी दराचा उच्चाक मोडत मंगळवारी सांगली बाजारात हळद दराने पुन्हा क्विंटलला ७० हजारांचा टप्पा गाठला असून सोन्यापेक्षा अधिक दर हळदीला मिळाला आहे. गेल्या आठवड्यात हळद दराने ६१ हजारांचा विक्रम नोंदवला होता. सांगली बाजार समितीमध्ये मंगळवारी काढण्यात आलेल्या हळद सौद्यामध्ये संगमेश्‍वर ट्रेडर्स या बाजार समिती संचालक काडाप्पा वारद यांच्या अडत दुकानामध्ये हळदीला प्रति क्विंटल ७० हजारांचा दर मिळाला. मल्लिकार्जुन तेली (रा. हदीगुंद, ता. रायबाग, जि. बेळगाव) या शेतकर्‍याने विक्रीसाठी आणलेल्या राजापुरी हळदीला हा सर्वोच्च दर मिळाला. शेतकर्‍याचे ११ पोत्यांचे एक कलम होते. या हळदीची सर्वोच्च बोली खरेदीदार श्रीकृष्ण कार्पोरेशन या पेढीकडून लावण्यात आली.


मंगळवारी झालेल्या सौद्यासाठी १७ हजार ५२५ क्विंटल इतकी आवक असून यापैकी ९३५८ पोती इतकी विक्री झाली आहे. आज हळदीस कमीत कमी दर रुपये १६ हजार ५०० व जास्तीत जास्त ७० हजार इतका झाला, याप्रसंगी मोठ्या प्रमाणात खरेदीदार, व्यापारी, शेतकरी, हमाल आदी उपस्थित होते.
बाजार समितीचे सभापती सुजयनाना शिंदे यांनी हळद उत्पादन करणारे शेतकरी व अडत व्यापारी यांचा सत्कार केला तसेच शेतकर्‍यांनी आपली हळद हा शेतीमाल सांगली बाजारात विक्रीसाठी आणावा असे आवाहन सभापती शिंदे व सचिव महेश चव्हाण यांनी केले आहे.