Sangli Samachar

The Janshakti News

बाल्टिमोर पूलाला धडकणा-या जहाजातील 22 भारतीय क्रू मेंबर्स सुरक्षित

सांगली समाचार  - दि. २७ मार्च २०२४
अमेरिकेतून श्रीलंकेला माल घेऊन जाणाऱ्या कंटेनर जहाजाच्या धडकेमुळे मेरीलँड राज्यातील बाल्टिमोर शहरात 3 किमी लांबीचा पूल कोसळला आहे. न्यूज एजन्सी एएफपीच्या रिपोर्टनुसार, हे जहाज सिनर्जी मरीन ग्रुपशी संबंधित होते. ज्यात 22 क्रू मेंबर्स होते. हे सर्व जण भारतीय असून ते सुरक्षित असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या जहाजाने फ्रान्सिस स्कॉट की ब्रिजला जाणूनबुजून लक्ष्य केल्याचा कोणताही पुरावा सापडला नसल्याचे बाल्टिमोर पोलिसांनी म्हटले आहे.
न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन वेळेनुसार रात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. पुलावर आदळल्यानंतर कंटेनर जहाजाने लगेच पेट घेतला. सिंगापूरचा ध्वज असलेले हे जहाज श्रीलंकेची राजधानी कोलंबोला जात होते. 22 एप्रिलला ते श्रीलंकेत पोहोचणार होते.


दोन वैमानिकांसह सर्व क्रू मेंबर्सची माहिती घेण्यात आली असून कोणीही दुखापतग्रस्त नाही. तसेच अपघातानंतर कोणतेही प्रदूषण झालेले नाही, असे चार्टर मॅनेजर, सिनर्जी मरीन ग्रुपने सांगितले. सिंगापूर ध्वजांकित हे जहाज नोंदणीकृत ग्रेस ओशन पीटीई लिमिटेड या कंपनीचे आहे.

जाणून घ्या 'फ्रान्सिस स्कॉट की ब्रिज'बद्दल

१९७७ मध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. या पुलाचे नाव "द स्टार-स्पँगल्ड बॅनर"च्या लेखकाच्या नावावरून ठेवण्यात आले होते, असे एटीएने त्यांच्या वेबसाइटवर म्हटले आहे.फ्रान्सिस स्कॉट की १८१४ मध्ये फोर्ट मॅकहेन्रीवर झालेला बॉम्बस्फोट पाहिल्यानंतर पुलाजवळ बसला होता. असे मानले जाते की ज्यामुळे त्याला अमेरिकेचे राष्ट्रगीत लिहिण्याची प्रेरणा मिळाली. बाल्टिमोर पोर्टने गेल्या वर्षी सुमारे ८० अब्ज डॉलर किमतीच्या ५२ दशलक्ष टनांहून अधिक आंतरराष्ट्रीय मालवाहतूक केली. मेरीलँड सरकारच्या वेबसाइटनुसार, अमेरिकेतील बंदरांमध्ये बाल्टिमोर पोर्ट एकूण नवव्या क्रमांकावर आहे.