yuva MAharashtra काँग्रेसच्या पहिल्या यादीत असं साधलं 'सोशल इंजिनिअरिंग'

काँग्रेसच्या पहिल्या यादीत असं साधलं 'सोशल इंजिनिअरिंग'



सांगली समाचार- दि. ९ मार्च २०२४
नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता काही दिवसांतच जाहीर होण्याची शक्यता आहे. तत्पुर्वीच भाजपने आपल्या 195 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर काँग्रेसनेही आपल्या 39 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत भाजपने साधलेले सोशल इंजिनिअरिंगचा प्रयत्न काँग्रेसच्याही यादीत दिसून येत आहे. दरम्यान, भाजपने पहिल्या यादीत उत्तर भारतातील उमेदवारांवर जास्त स्थान दिले तर काँग्रेसने दक्षिण भारतावर फोकस केल्याचे दिसून येत आहे.

भाजपनंतर काँग्रेसच्या यादीकडे देशाचे लक्ष लागेल होते. काँग्रेस निवडणूक समितीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर शुक्रवारी उमदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 15 उमेदवार हे जनरल प्रवर्गातील आहेत. 24 उमेदवार हे अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि इतर मागासवर्ग (OBC) आणि अल्पसंख्याक गटातील आहेत. आपल्या 39 उमेदवारांच्या पहिल्या यादीतील 12 उमेदवार 50 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. आठ उमेदवार 50-60 वयोगटातील आहेत. तर 12 उमेदवार 61-70 वयोगटातील असून सात जणांचे वय हे 71-76 वर्षे आहे.


दरम्यान, भाजपने  आपल्या पहिल्या यादीत 34 केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्र्यांचा समावेश केला आहे. या उमेदवारांपैकी 28 महिला आहेत. 47 उमेदवार 50 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. यादीत 27 अनुसूचित जाती आणि 18 एसटी उमेदवार आहेत. 195 पैकी 57 ओबीसी उमेदवारांना लोकसभा निवडणुकीत भाजपने संधी दिलेली आहे. भाजपच्या यादीत उत्तर भारतातील उमेदवारांची छाप दिसून आली. त्यात उत्तर प्रदेश 51, पश्चिम बंगाल 20, मध्य प्रदेश 24, गुजरात 15, राजस्थान 15, केरळ 12, तेलंगणा 9, आसाम 11, झारखंड 11, छत्तीसगड 11, दिल्ली 5, जम्मू कश्मीर 2, उत्तराखंड 3, अरुणाचल प्रदेश 2, तर गोवा, त्रिपुरा, अंदमान निकोबार, दमन दीव येथील प्रत्येकी एक असे एकूण 195 उमेदवार भाजपने जाहीर केले आहेत.