Sangli Samachar

The Janshakti News

महायुती असो वा महाआघाडी जागावाटपाचा घोळ संपता संपेना; इच्छुकांचा जीव मात्र टांगणीला



सांगली समाचार - दि. ८ मार्च २०२४
मुंबई - २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तारीख कुठल्याही क्षणी जाहीर होऊ शकते. परंतु महायुती असो व महाआघाडी यातील घटक पक्षांनी हक्काच्या जागेचा हट्ट कायम ठेवल्याने उमेदवारीचा तिढा सुटता सुटेना. त्यामुळे उमेदवारीतील "सस्पेन्स" कायम राहिला आहे, तर माध्यमांनी यातील उत्सुकता वेगवेगळ्या बातम्यांनी अधिकच ताणली आहे.
महायुतीतील शिंदे गट शिवसेना आणि अजित दादा राष्ट्रवादी गट यांनी 13 - 10 च्या जागेवर आपला हट्ट कायम ठेवला आहे. गृहमंत्री तथा भाजपचे चाणक्य अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात हा तिढा सुटेल असे वाटले होते. परंतु एकनाथ शिंदे वा अजित दादा पवार आपल्या इच्छुकांना नाराज करायला तयार नाहीत. याशिवाय इतर घटक पक्षांनीही आपली जागेची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे खरी गोची झाली आहे, ती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व भाजपाचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांची.


चर्चेचे गुऱ्हाळ संपत नाही आणि घटक पक्ष आपला हट्ट सोडायला तयार नाहीत, हे पाहून त्यांनी महाराष्ट्रातील इतर वरिष्ठांसह दिल्ली गाठली. परंतु "शतप्रतिशत भाजपा" या निर्णयावर अमित शहा ठाम आहेत. आणि म्हणूनच हा तिढा कसा सुटतो व यावर मार्ग कसा निघतो ? हे दोन दिवसात स्पष्ट होईल.
इकडे महाआघाडीचीही स्थिती वेगळी नाही. जनतेतील उद्धव ठाकरेंना असलेली सहानुभूती लक्षात घेऊन त्यांना आघाडीत अधिक जागा देण्याचा शरद पवार यांचा विचार आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट व त्या पाठोपाठ काँग्रेसला जागा देऊन, त्यांनी वडीलकीच्या समजूतदारीची भूमिका निभावलेली दिसते. कोणाला किती जागा द्यायच्या हे जरी निश्चित झालं असलं, तरी महायुतीच्या आव्हानासमोर कोण टिकेल आणि विजयाची माळ आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या गळ्यात कशी पडेल, यावर त्यांचा अधिक भर आहे. आणि म्हणूनच शरद पवार यांनी सर्वांनाच सबुरीने घेण्याचा व आपली ताकद पाहून निर्णय घेण्याचा सल्ला दिला आहे. वंचितचे अजूनही तळ्यात मळ्यात आहे. ते आपले पत्ते उघड करण्यास तयार नाहीत. महायुतीला टक्कर द्यायचे तर महाआघाडीला आपली गरज आहे हे ओळखून आपल्या पदरात अधिकचे पाडून घेण्यासाठी त्यांनी आपले घोडे बाहेरच बांधलेले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी उत्सुकता ताणलेली दिसून येत आहे.
इकडे सांगली लोकसभा मतदारसंघाचा विचार करायचा झाला तर, कालपर्यंत आपली उमेदवारी निश्चित मानून तयारीला लागलेले संजय काका बॅकफूटवर गेलेले दिसतात. कालच झालेल्या सांगली जिल्हा भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत, आणि तत्पूर्वीही पक्ष देईल त्या उमेदवाराच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहू असे जाहीर केले आहे. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते संभ्रमात पडलेले आहेत. भाजपा संजय काकांना तिकीट देणार की पृथ्वीराज देशमुख यांना ? या घोळात भाजप अडकलेली असतानाच, काँग्रेसचा घोळही संपता संपत नाही. कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा ठाकरे गटाला देण्याचा निर्णय झाला असून पै. चंद्रहार पाटील हे त्यांचे उमेदवार असतील, अशा बातम्या माध्यमातून प्रसिद्ध होत असतानाच, सांगलीतील आणि महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते सांगलीची जागा आपल्यालाच मिळणार असून कार्यकर्त्यांनी तयार राहावे, असा संदेश दिलेला आहे. काँग्रेसकडून विशाल पाटील यांचे एकमेव नाव पुढे आलेले आहे. जिल्ह्यातील काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याचा निर्णयही घेतला आहे. परंतु घोडे अडले आहे ते राष्ट्रवादीच्या दारात... आणि या मागचे गुपितही उघड आहे. अशातच जर ठाकरे गटाने मोठेपणा दाखवून काँग्रेसला ही जागा सोडली तर "वंचित" चा फॅक्टर 2019 ची पुनरावृत्ती करतो का ? आणि पै. चंद्रहार पाटील त्यांची ऑफर स्वीकारतात की अपक्षांसह मार्ग निवडतात. हा त्यांचा निर्णय महत्त्वाचा ठरेल.  विशाल पाटील यांना तिकीट नाकारले तर काँग्रेसचे स्थानिक नेते व कार्यकर्ते काय भूमिका घेतात ? यावरही प्रतिस्पर्धी उमेदवाराचे भविष्य ठरणार आहे... दुसरीकडे मराठा आणि ओबीसी आपले मते कोणाच्या पारड्यात टाकतात ? यावरही बरेचसे अवलंबून आहे... 
तूर्तास सांगलीतून लोकसभेत कोण जाणार ? ही चर्चा जोपर्यंत वरिष्ठ पातळीवर ठाम निर्णय होत नाही, तोपर्यंत अशी सुरू राहणार हे निश्चित...