सांगली समाचार - दि. २१|०२|२०२४
कोच्ची - 'इच्छा तेथे मार्ग' अशी मराठीत एक म्हण आहे. या म्हणीचं मूर्तीमंत उदाहरण म्हणून एखाद्या व्यक्तीचं नाव घ्यायचं झालं तर केरळमधील श्रीनाथ के. नावाच्या हमालाचं नाव घेता येईल. श्रीनाथ हे आपल्या पहिल्याच प्रयत्नामध्ये भारतीय प्रशासकीय सेवेची परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी झाले आहेत. श्रीनाथ यांची यशोगाथा ही फारच प्रेरणादायी आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला श्रीनाथ यांनी ज्या पद्धतीने संघर्ष करुन हमाल म्हणून काम करताना दिलेल्या परीक्षेच्या माध्यमातून आयएएस अधिकारी पदापर्यंत घेतलेली झेप ही एखाद्या स्वप्नासारखी वाटेल.
श्रीनाथ के कोच्ची रेल्वे स्थानकावर हमाल म्हणून काम करायचे. त्यांनी सरकारी नोकरी मिळवण्याच्या इच्छेने आणि अधिक पैसे कमवून चांगलं आयुष्य जगता यावं असा विचार करुन परीक्षा देण्याचं ठरवलं. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण रेल्वे स्थानकावरील फ्री वायफायची सुविधा वाचून हमाल असलेल्या श्रीनाथ यांनी रेल्वे स्थानकामध्ये बसूनच स्पर्धा परीक्षेसाठी कसून अभ्यास केला. याचा परिणाम असा झाला की आपल्या पहिल्याच प्रयत्नात ते केरळमधील केपीएसी केएएस परीक्षा उत्तीर्ण झाले. यानंतर त्यांना राज्य सरकारची नोकरी मिळाली. मात्र आता श्रीनाथ यांचं स्वप्न अधिक मोठं होतं. त्यांना आता आयएएस व्हायचं होतं.
२०१६ मध्ये रेल टेल आणि गुगलने भारतात अनेक रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सेवा पुरवण्याची योजना हाती घेतली होती. या मोफत वायफाय योजनेचे लाभ घेत श्रीनाथ यांनी अनेक ऑडिओ बुक्स, व्हिडीओ डाऊन लोड करुन ऐकले/पाहिले आणि परीक्षेची तयारी केली. हमाली करता करताच श्रीनाथ केपीएसीच्या परीक्षेची तयारी करत होते. या परीक्षेच्या तयारीसाठी श्रीनाथ यांनी मेमरी कार्ड, स्मार्टफोन आणि हेडफोन्सही हमाली करुन कमावलेल्या पैशांमधून नव्याने विकत घेतले होते. आपल्या पहिल्याच प्रयत्नात श्रीनाथ उत्तीर्ण झाले.
२०१८ मध्ये तत्कालीन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी श्रीनाथ यांचं कौतुक केलं होतं. 'गुगल इंडिया'नेही अगदी अभिमानाने श्रीनाथ यांची यशोगाथा शेअर केली होती. आपल्या पहिल्याच प्रयत्नात श्रीनाथ यांनी केपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांना चांगले मार्कही मिळाले होते. मात्र ते तेथे थांबले नाहीत. श्रीनाथ यांना आयएएस अधिकारी व्हायचे होते. त्यांनी युपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली.
श्रीनाथ एकीकडे युपीएससीच्या परीक्षेची तयारी करत असताना दुसरीकडे २ शिफ्टमध्ये काम करु लागले. काम, घरी वेळ देणं आणि अभ्यास अशा तिहेरी आघाड्यांवर श्रीनाथ संघर्ष करत होते. मात्र त्यावेळेही ते दिवसाला ५०० रुपये कमवत होते. युपीएससीच्या आपल्या चौथ्या प्रयत्नामध्ये श्रीनाथ यांना यश आलं आणि ते परीक्षा उत्तीर्ण झाले. आजही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या अनेकांना श्रीनाथ यांचं उदाहरण दिलं जातं.