Sangli Samachar

The Janshakti News

लाखोंची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दांपत्यास अटक

 


सांगली समाचार  - दि. २४|०२|२०२४

सांगली - गुंतवणूक रकमेवर दरमहिना ७ ते ९ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून १३ गुंतवणूकदारांची तब्बल ८८ लाख ४२ हजार ३०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या दांपत्यास पोलिसांनी अटक केली. यामध्ये आर्थिक गुन्हे शाखेने महत्वाची कामगिरी बजावली, अटक करण्यात आलेल्यामध्ये कुलदिप चंद्रकांत काशीद (वय ३७) आणि त्याची पत्नी स्मिता कुलदिप काशीद (दोघेही रा. कमानवेस, मंगळवार पेठ, मिरज) यांचा समावेश आहे. दरम्यान संशयित स्मिता हिला दि. १ रोजी अटक करण्यात आली असून सध्या ती न्यायालयानी कोठडीत आहे. याबाबत आरती रविचंद्र होसपुरे (रा. मिरज) यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली होती. 

सदर घटनेची माहिती अशी, संशयित कुलदीप काशीद आणि त्याची पत्नी स्मिता या दोघांनी के, के, कन्सल्टन्सी स्टॉक मार्केट रिसर्च ॲण्ड नालिसीस नावाची कंपनी २०२१ साली स्थापन केली होती. त्यामध्ये पैसे गुंतवल्यास त्यावर दरमहा ७ ते ९ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. जादा परताव्याच्या आमिषाला बळी पडून फिर्यादी आरती होसपुरे यांच्यासह अन्य गुंतवणूकदारांनी ५७ लाख ५० हजार रुपये कंपनीत गुंतविले. दाम्पत्याने गुंतवणूकदारांना १३ लाख ६१ हजार २०० रुपये परतावा दिला. परंतु उरल्याप्रमाणे परतावा देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे गुंतवणूकदारांनी गुंतविलेली रक्कम परत मागितली असता ती देण्याकडेही दांपत्याने दुर्लक्ष केले. त्यामुळे संबंधित गुंतवणूकदारांनी त्यांची ४३ लाख ८८ हजार ८०० रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार पोलीस अधिक्षकांकडे केली होती. सदर तपास आर्थिक गुन्हे शाखेने केला. यासंदर्भात मिरज शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र अधिनियम अंतर्गत दांपत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान सन २०२१ ते दि. ११ जानेवारी २०२४ या कालावधीत भामट्या दांपत्याने १३ गुंतवणूकदारांची तब्बल ८८ लाख ४२ हजार ३०० रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान संशयित स्मिता काशीद हिला दि.१ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी अटक केली होती. मात्र कुलदीप हा पसार होता. मिरज शहर पोलिसांना संशयित कुलदीप हा मिरजेत येणार असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे सापळा रचून दि. २२ रोजी रात्री पावणे दहा वाजता पोलिसांनी संशयित कुलदीप यास ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्तींनी त्यास २ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.