सांगली समाचार - दि. २४|०२|२०२४
सांगली - श्रीमती राजमती नेमगोडा पाटील ट्रस्ट, सांगली यांचेवतीने प्रतिवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय, 'स्व. नेमगोंडा दादा पाटील जनसेवा पुरस्कार २०२४' यावर्षीं निवृत्त एअर चीफ मार्शल प्रदीप नाईक, पुणे यांना संरक्षण क्षेत्रात वायुदलातील अतुलनीय कार्याबद्दल दिला जाणार असून, जनसेवा पुरस्काराचे स्वरूप ५० हजार रुपये रोख, मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे आहे तसेच 'स्व. राजमती नेमगोंडा पाटील विशेषसेवा पुरस्कार २०२४ शौर्यचक्र पुरस्कार प्राप्त निवृत्त बिंग कमांडर प्रकाश नवले, सांगली यांना संरक्षण क्षेत्रात वायुदलातील केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल दिला जाणार असून, पुरस्काराचे स्वरूप २१ हजार रुपये रोख, मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे. यंदाचा ३३ वा पुरस्कार वितरण सोहळा स्व. नेमगोंडा दादा पाटील यांच्या ५१ च्या पुण्यतिथी निमित्त सांगली गणपती पंचायत संस्थानचे अधिपती श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन यांच्या शुभहस्ते राजमती भवन, नेमिनाथनगर, सांगली येथे बुधवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ रोजी दु. ४ बा. दिला जाणार आहे. अशी माहिती ट्रस्टचे मानद सचिव सुरेश पाटील यांनी दिली.
ते म्हणाले, २०२४ सालच्या 'स्व, नेमगोंडा दादा पाटील जनसेवा' पुरस्काराचे मानकरी असलेले निवृत्त एअर चीफ मार्शल प्रदीप नाईक यांनी देशाच्या संरक्षणासाठी ४३ वर्षाच्या कार्यकिर्दीमध्ये भारतीय वायुदलाचे नेतृत्व केले आणि भारतीय हवाई दलाला अनेक महत्त्वाच्या संकट व शांततेच्या काळात खणकर नेतृत्व दिले, त्यांनी विविध प्रकारचे लढाऊ आणि प्रशिक्षण बिमाने उडवली आहेत. यामध्ये मिग २१ च्या सर्व प्रकारांवरील विस्तृत ऑपरेशनल अनुभवाचा समावेश आहे. फ्रंट लाईन फायटर स्कॉड्रानचे नेतृत्व करण्यासोबतच एअर चीफ मार्शलनी बिदर येथील महत्त्वाच्या फायटा बेस आणि एअर फोर्स स्टेशनचे नेतृत्व केले आहे. डिफेन्स सव्हीसेस स्टाफ कॉलेजमधील कर्मचा-यांना मार्गदर्शन करणे हा देखील त्यांच्या उत्कृष्ट ट्रॅक रेकॉर्डचा एक भाग आहे.
हवाई दल प्रमुख म्हणून नियुक्त होण्यापूर्वी ते मुख्यालय वेस्टर्न एअर कमांड मध्ये वरिष्ठ हवाई कर्मचारी अधिकारी, सेंट्रल एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ आणि व्हाईस चीफ ऑफ एअर स्टाफ राहिले आहेत. त्यांनी १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये पूर्व आणि पश्चिम क्षेत्रामध्ये हवाई हमल्यामध्ये सहभाग घेतला होता. त्यांना पाम विशिष्ट सेवा आणि विशिष्ट सेवा पदक प्राप्त झाली असून भारताच्या माननीय राष्ट्रपतींचे मानद एडीसी म्हणून ही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. ते भारताच्या इंटरनॅशनल मुव्हमेंट टू युनायटेड नेशन्स सल्लागार बोर्डचे सदस्य आहेत. अशा आपल्या महाराष्ट्रीय मराठी उत्तुंग व्यक्तिमत्वास त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना यंदाचा 'स्व. नेमगोंडा दादा पाटील जनसेवा' पुरस्कार २०२४' प्रदान करण्यात येत आहे.
'स्व. राजमती नेमगोंडा पाटील विशेषसेवा पुरस्कार २०२४' चे मानकरी असलेले निवृत्त विंग कमांडर प्रकाश नवले सुरुवातीला फायटर पायलट म्हणून व नंतर हेलिकॉप्टरकडे वळले, त्यांची बहुतेक उड्डाणे उत्तर पूर्व आणि हिमालयात होती. १० हजार पेक्षा जास्त फ्लाईंग तासासह १२ विविध प्रकारच्या विमानांचे उड्डाण त्यांनी केले. श्रीलंकेतील भारतीय शांतता रक्षक दलात त्यांनी सहभाग घेतला. एअरफोर्स अकादमी मध्ये चीफ फ्लाईंग इन्स्ट्रक्टर पदाच्या कार्यकाळानंतर १९९४ मध्ये मुदतपूर्व सेवा निवृत्ती घेतली, २००७ मध्ये पवन हंस मध्ये सामील झाले आणि २०१८ मध्ये दूसरी सेवा निवृत्ती घेतली. अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि ओडीसा भागात त्यांनी उड्डाण केली आहेत.
त्यांनी १९८० साली आपल्या दृढनिश्चिय, धैर्य, मनाची उपस्थिती आणि उच्च पदावरील कर्तव्याची निष्ठा दाखवीत ओरिसाच्या पूरग्रस्त भागातील आंदोलकापासून एका व्हीआयपी लोकप्रतिनिधी नेत्याची सुखरूप सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. अंकलखोपचे थोर स्वातंत्र्य सेनानी धुळाप्पा नवले यांचे ते चिरंजीव होत. त्यांना शौर्यचक्र पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, गव्हर्नर्स सुवर्णपदकांनी सन्मानित करण्यात आले आहे. या त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना यंदाचा 'स्व. राजमती नेमगोंडा पाटील विशेषसेवा २०२४ प्रदान करण्यात येत आहे.
या ट्रस्टच्यावतीने यापूर्वी स्व. नेमगोंडा दादा पाटील जनसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्यामध्ये क्रांतिवीर नागनाथ आण्णा नायकवडी, शांतीलालजी मुथा, श्रीमती मेधा पाटकर, डॉ. डि.के. गोसावी, आण्णासो हजारे, आर. के. लक्ष्मण, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. कल्याण गंगवाल, डॉ. विलास सांगवे, प्रा. रा. ग. जाधव, राजेंद्र सिंह राणा, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, प्रा. द. म. हातकणंगलेकर, संजय नहार, सुरेश खोपडे, लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. तात्याराव लहाने, सुरेश खानापूरकर, राजू शेट्टी, डॉ. अभय बंग, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. संजय ओक, पंडित उल्हास कषाळकर यांचा समावेश आहे.
तसेच स्व. राजमती नेमगोंडा पाटील विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्यामध्ये विदुलता शहा, डॉ. लीला पाटील, संगीता झाडांचे, स्वा. सैनिक राजमती बिरनाळे मेहरूनिसा दलवाई, उषा मेहता, विद्या बाळ, प्रा. रेवती हातकणंगलेकर, डॉ. एस ए मंटगणी, बाळ पळसुळे, संजय माने, डॉ. माधुरी पाटील, विजयाताई लवाटे, सुश्री आचार्या चंदनाची, मनीषा म्हैसकर, विलास शिंदे, श्रीमती उषादेवी पाटील, हर्षद अविराज या मान्यवरांचा समावेश आहे.
यावेळी राजमती ट्रस्टचे मॅनेजिंग ट्रस्टचे सुदर्शन पाटील, प्रमोद पाटील, अनिकेत पाटील, प्रीतम चौगुले हे उपस्थित होते. सदर सत्कार समारंभास नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ट्रस्टचे मानस सचिव सुरेश पाटील यांनी यावेळी केले.