सांगली समाचार - दि. २४|०२|२०२४
शिरोळ - राज्य सरकारच्यावतीने धार्मिक स्थळांच्या सर्वांगिण विकासासाठी तसेच पर्यटनांच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यातील पवनार (जि. वर्धा) ते पत्रादेवी (जि. सिंधुदुर्ग) या महाराष्ट्र गोवा सीमेपर्यंतच्या महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाचे बांधकाम करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. या मार्गासाठी संपादित करणाऱ्या जमीनीला चौपटीने दर दिला तरच महामार्गासाठी जमीनी देवू अन्यथा प्रसंगी रक्ताचे पाट वाहतील पण, शेतकऱ्यांची एक इंचसुध्दा जमीन सरकारला संपादित करू न देता हा महामार्ग होवू देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिला.
प्रस्तावित महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग हा वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड. परभणी, बीड, लातुर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सिंधदुर्ग या १२ जिल्ह्यातून पुढे कोकण या रस्त्यासाठी शासनाकडून लाखो शेतकऱ्यांची हजारो एकर संपादित केली जाणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय / राज्य महामार्ग प्रकल्पाच्या भूसंपादन प्रकरणी मोबदल्याच्या रकमेची परिगणना कायदा पुर्वीप्रमाणे चौपटीने करूनच भुसंपादन करावे, अन्यथा राज्यातील शेतकरी हा प्रकल्प होवू देणार नाहीत, असाही सज्जड इशारा राजू शेट्टी यांनी राज्यकर्त्यांना दिला.