Sangli Samachar

The Janshakti News

'क्यूआर कोड' स्कॅनमधील धोका वाढतो आहे

 


सांगली समाचार  - दि. २०|०२|२०२४

सध्याच्या इंटरनेटच्या जगात झटपट गोष्टी करण्याची सवय वाढत चालली आहे. त्यामुळे पैसे देण्यासाठीसुद्धा 'क्यूआर कोड' म्हणजे क्विक रिस्पॉन्स पद्धतीचा वापर मोठ्या झपाट्याने लोकप्रिय झाला आहे. या वेगवान पद्धतीने केल्या जाणाऱ्या कामाच्या सवयीचा उपयोग आता चोरटेही फसवणुकीसाठी वापर करू लागले आहेत.

आजकाल आर्थिक व्यवहारांप्रमाणे माहिती घेण्यासाठीदेखील 'क्यूआर कोड' दिले जातात. ते पटकन स्कॅन करून पुढे जाण्याची सवय सर्वांनाच झाली आहे. चोरटे याचा उपयोग फिशिंग ॲटॅकसाठी करू लागले आहेत. फिशिंग ॲटॅक म्हणजे बनावट लिंक किंवा मेसेज पाठवून लुबाडणे.

हे कसे घडते?

अशा तऱ्हेने आलेली लिंक आपण घाईघाईत उघडली आणि त्यावर क्लिक केले, की त्याद्वारे आपली माहिती घेतली जाते. त्यानंतर पुढची पायरी म्हणजे 'ओटीपी' अथवा 'पिन' विचारला जातो आणि भाबडे लोक तो देतातही. हे सर्व इतक्या झटपट होते, की आपली फसवणूक झाली आहे, हे कळेपर्यंत उशीर झालेला असतो.

काय काळजी घ्यावी?

आजकाल 'क्यूआर कोड' एखाद्या वेबसाईटवर अधिक माहितीसाठी किंवा जाहिरातीतही असतात. त्यावर क्लिक केले, की ते दुसऱ्या साईटवर घेऊन जातात आणि आपली फसवणूक होऊ शकते.

कोठेही 'क्यूआर कोड' स्कॅन करण्यापूर्वी थोडे थांबा; विचार करा; त्याची विश्वासार्हता तपासा आणि मगच स्कॅन करा.

आपल्या मोबाईलमध्ये सुरक्षित 'क्यूआर कोड' स्कॅनर डाउनलोड करा. त्यात आलेली यूआरएल लिंक अधिकृत आहे का, याची तपासणी केली जाते.

मोबाईलमध्ये अधिकृत अँटीव्हायरस सॉफ्टवेअर घाला.

मोबाईलचे सॉफ्टवेअर अद्ययावत ठेवा.

मोबाईलमधील ॲपला दिलेल्या परवानग्या तपासा; नको असलेल्या काढून टाका.

आपल्या सर्व पैसे देण्याच्या पर्यायांना दुहेरी प्रमाणीकरण  ठेवा. यामुळे फक्त पासवर्ड टाकला, की पैसे हस्तांतर केले जाणार नाहीत, तर ती यंत्रणा पासवर्डनंतर 'ओटीपी' मागेल आणि मगच व्यवहार पूर्ण होईल. उदा. गुगल पे वापरताना नेहमी 'गुगल पिन' आणि 'यूपीआय पिन' दिल्याशिवाय पैसे दिले जाणार नाहीत, अशी व्यवस्था करा.

काही बँका त्यांचे कार्डवरचे व्यवहार पूर्ण होण्याआधी तुम्हाला मेसेज पाठवतात आणि विचारतात, की हा व्यवहार तुम्हीच केला आहे का? आणि आपण 'हो' म्हटल्यानंतरच व्यवहार पूर्ण करतात. अशी सोय असेल, तर तीही घ्यावी.

फसवणूक झाल्यास...

https://cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा.

त्वरित १९३० किंवा १५५२६० या क्रमांकावर संपर्क साधा. यावरील यंत्रणा तातडीने योग्य ती कार्यवाही करते.

नेटबँकिंग, यूपीआय, जीपे, पेटीएमचे पासवर्ड नियमितपणे बदलत राहा.