Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीतील निर्धार फौंडेशनचा आंतरराष्ट्रीय गौरव


 


सांगली समाचार  - दि. २१|०२|२०२४

सांगली - सांगलीतील तरुणांच्या एका गटाने स्वच्छतेत मैलाचा दगड ठरावा अशी कामगिरी नोंदवित अखंडित २ हजाराहून अधिक दिवस अभियान राबविले. अजूनही त्यांचा हा स्वच्छतेचा प्रवास सुरुच आहे. त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नांची दखल इंडियाज् वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थेने घेतली होती. पाठोपाठ इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थेनेही त्यांच्या गळ्यात विश्वविक्रमाची माळ घातली आहे.

सांगलीच्या निर्धार फाऊंडेशनमार्फत दड्डणावर यांनी १ मे २०१८ रोजी स्वच्छता अभियानाला सुरुवात केली. नागरिकांना सुरुवातीला ही औपचारिकता वाटली, पण शहरातील अनेक भागांचे रूपडे बदलू लागले तेव्हा अनेक तरुण, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, शासकीय अधिकारी त्यांच्या अभियानात सहभागी झाले. अभियानाची व्यापकता वाढत गेली. सुरुवातीला शहरापुरती मर्यादित असणारी ही मोहीम शहरालगतच्या गावांमध्ये पोहचली. नंतर जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेरही तिचा डंका वाजला आहे.

आषाढी एकादशीनंतर पंढरपूरच्या मंदिर परिसरासह संपूर्ण घाट या फाऊंडेशनने चकाचक केला. त्यानंतर राज्यभरातील युवक या अभियानाशी जोडले गेले. कोणत्याही शासकीय मदतीशिवाय दड्डणावर व त्यांच्या ग्रुपने गलिच्छ वस्त्यांना सुंदरतेचे वरदान दिले. १ मे २०१८ रोजी त्यांनी हाती घेतलेला झाडू आजही त्यांच्या हाती टिकलेला आहे. एक दिवसाचाही खंड न पाडता या तरुणांनी मोहीम राबविली. अभियानास २ हजार दिवस पूर्ण होताच इंडियाज् बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने त्यांना प्रमाणपत्र दिले.

शहर, गावांचे रुपडे पालटले

दड्डणावर व त्यांच्या टीमने अस्वच्छ परिसर स्वच्छ केले, सेल्फी पॉईंट उभारले, बसस्थानके, दुभाजके, चाैक, स्मशानभूमी अशा अनेक ठिकाणांचे रूपडे त्यांनी पालटले. राजकीय नेत्यांसह परिसरातील बड्या अधिकाऱ्यांनीही या मोहिमेत सहभाग नोंदवून त्यांच्या कार्याचा गौरव केला.