Sangli Samachar

The Janshakti News

पोलिस अधिका-यांच्या निरोप समारंभावर पाबंदी !


                                                   (संग्रहित छायाचित्र)

सांगली समाचार  - दि. २६|०२|२०२४

मुंबई - पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर त्यांना दिले जाणारे निरोप समारंभ व फेटे बांधून जीपमधून त्यांची मिरवणूक काढणे, या गोष्टी यापुढील काळात करता येणार नाहीत. राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी याबाबत एक परिपत्रक प्रसिद्ध दिले असून, अशा स्वरूपाचे कृत्य घडल्यास संबंधितांवर कारवाईचा इशारा यात देण्यात आला आहे.

याबाबत प्रसिद्धदिलेल्या पत्रकात रश्मी शुक्ला यांनी नमूद केले आहे की, महाराष्ट्र राज्य पोलिस दलातील विविध दर्जाच्या पोलिस अधिकारी/अंमलदार यांच्या शासन नियमानुसार तसेच प्रशासकीय कारणास्तव बदल्या होत असतात. बदली  ही एक नित्याची वाव आहे. अशा एका घटकातून/ठिकाणाहून दुसऱ्या घटकांत/ठिकाणी बदली झालेल्या पोलिस अधिकारी यांच्या सन्मानार्थ विविध पोलिस ठाणे / शाखांमध्ये निरोप समारंभ आयोजित केले जातात. अशा समारंभामध्ये संबंधित पोलिस अधिकारी हे पोलिस गणवेष परिधान केलेला असताना त्यावर रंगीत फेटे बांधणे, त्यांच्यावर फुलांचा अति प्रमाणात वर्षाव करणे, त्यांना वाहनात बसवून संबंधित पोलिस ठाणे / शाखेच्या अधिकारी / अंमलदार यांनी वाहनास दोरीने ओढत नेणे, असे प्रकार निदर्शनास आले आहेत. तसेच त्यांना शासकीय वाहनात बसवून सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांसारखे त्यांना निरोप दिला जातो, असे प्रकार पोलिस दलाच्या प्रमाणित कार्यपध्दतीला अनुसरून नाही.

गौरव सोहळ्याचा कार्यक्रम अधिकारी स्वतः किंवा त्यांच्या हस्तकामार्फत स्वस्त प्रसिध्दी मिळविण्यासाठी सोशल मीडियावर प्रसारित करतात. त्यामुळे उलट ते जनमानसात चेष्टेचा, उपहासाचा विषय बनतात. स्थानिक नागरिक हे अधिकाऱ्याने केलेल्या चांगल्या कामांचा, कर्तृत्वाचा नेहमी सन्मान करतात, न की अशा दिखाव्याचा.

सर्व पोलिस घटक प्रमुखांनी त्यांच्या कार्यक्षेत्रांतर्गत पोलिस ठाण्यांमध्ये/शाखांमध्ये बदली झालेल्या पोलिस अधिकारी यांच्या बदलीचा निरोप समारंभ आयोजित करताना वरील प्रकार होणार नाहीत याची कटाक्षाने दक्षता घेणे आवश्यक असून आणि तशा सूचना त्यांचे अधिनस्थ सर्व पोलिस ठाणे / शाखा प्रभारी अधिकारी, सर्व पर्यवेक्षीय अधिकारी यांना सक्त सूचना देणे आवश्यक आहे.