Sangli Samachar

The Janshakti News

नवीन वा बंद शिधापत्रिकांसाठी आता हमीपत्र ग्राह्य धरले जाणार

सांगली समाचार  - दि. २५|०२|२०२४

सांगली - नवीन शिधापत्रिका तसेच बंद असलेल्या शिधापत्रिका परत मिळण्यासाठी उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी आता  हमीपत्रावर शिधापत्रिका मिळणार आहे. शासनाने तसा निर्णय घेतला आहे. पुरोगामी संघर्ष परिषदेचे संस्थापक प्रा. सुभाष वायदंडे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.

याबाबतची माहिती अशी, शासनाच्या नवीन निर्णयानुसार - शिधापत्रिका परत मिळण्यासाठी - ग्रामीण भागासाठी पस्तीस हजार रुपये व शहरी भागासाठी चव्वेचाळीस हजार रुपये अशी वार्षिक उत्पन्नाची  अट होती. तसेच सदरचा उत्पन्नाचा दाखला तहसीलदार यांच्याकडून आणणे बंधनकारक होते. 

मात्र यात अनेक गरजू आणि पात्र लोक भरडले जात होते. अनेकांना यासाठी मोठीच गैरसोय सहन करावी लागत होती. यासाठी ही अट रद्द करावी, यासाठी तीन वर्षे पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने वारंवार निवेदन देऊन व आंदोलन करून मागणी करण्यात येत होती. याची दखल घेत आता अन्न व नागरी पुरवठा खात्याने यासंबंधीचा अध्यादेश काढला आहे. आताच्या अध्यादेशानुसार आता वार्षिक उत्पन्नाच्या दाखल्याची गरज लागणार नाही. त्याऐवजी सदर कुटुंबप्रमुखांनी उत्पन्नाचे लेखी हमीपत्र दिल्यानंतर त्यांची बंद असलेली शिधापत्रिका सुरू करण्यात येणार आहे. यासाठी सातत्याने पाठपुरावा करत केलेल्या पुरोगामी संघर्ष परिषदेच्या आंदोलनाला यश आल्याचे अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांनी स्पष्ट केले.