Sangli Samachar

The Janshakti News

शक्तिपीठ महामार्गाने शेतकऱ्यांचा विकास होईल नितीन गडकरींचा विश्वास

 


सांगली समाचार  - दि. २५|०२|२०२४

लातूर - नागपूर ते रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होत आले आहे. या ९२० किलोमीटरच्या महामार्गासाठी तीस हजार कोटींचा खर्च करण्यात आला आहे. या महामार्गामुळे माहूरची रेणुकामाता, तुळजापूरची तुळजाभवानी माता, कोल्हापूरची अंबाबाई ही शक्तिपीठे जोडली गेली आहेत. या महामार्गामुळे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या चार विभागांचे दळणवळण वाढणार आहे. हा महामार्ग या विभागांसाठी जीवनरेखा असेल. या भागातील नागरिकांसह शेतकऱ्यांचा विकास होईल," असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

लातूर जिल्ह्यातून जाणाऱ्या तीन हजार ९४६ कोटीच्या १९० किलोमीटर महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण व काही महामार्गाचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते आज येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. क्रीडामंत्री संजय बनसोडे, खासदार सुधाकर श्रृंगारे, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे आदी उपस्थित होते.

येथील डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज भक्तीस्थळी हा कार्यक्रम झाला. यावेळी धाराशीव येथून आमदार राणाजगजितसिंह पाटील, नीती आयोगाचे क्षमता बांधणी सल्लागार प्रवीणसिंह परदेशी, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे आदी ऑनलाईन सहभागी झाले.

लातूर जिल्ह्यात दहा हजार कोटींचे महामार्ग तयार होत आहेत. जिल्ह्याची पाणीटंचाई दूर करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या कामातून नांदगाव, सारोळासह २२ ठिकाणी तलावाचे खोलीकरण केले. १८.७२ लाख घनमीटर गाळ काढून साठा वाढवून जलसंवर्धन केल्याचे त्यांनी सांगितले.

कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध

राज्य सरकारच्यावतीने धार्मिक स्थळांच्या सर्वांगिण विकासासाठी तसेच पर्यटनांच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यातील पवनार जि. वर्धा ते पत्रादेवी जि. सिंधुदुर्ग या महाराष्ट्र - गोवा सरहद्द पर्यंतच्या प्रवेश नियंत्रित शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गाचे (महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग) बांधकाम करण्याचा निर्णय नुकतेच राज्य सरकारने घेतले आहेत. या मार्गासाठी शासनाने संपादित करणा-या जमीनीला चौपटीने दर दिला तरच महामार्गासाठी जमीनी देवू अन्यथा हा महामार्ग होवू देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिला.