Sangli Samachar

The Janshakti News

निवडणुकीत पैशांचा गैरवापर खपवून घेतला जाणार नाही; निवडणूक आयुक्तांचा इशारा

 


सांगली समाचार  - दि. २५|०२|२०२४

चेन्नई - लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आज तामिळनाडूमध्ये दाखल झाले होते. यावेळी येथील पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, राजकीय पक्षांना आपल्या घोषणापत्रांमध्ये किंवा जाहीरनाम्यांमध्ये मतदारांना आश्‍वासने देण्याचा अधिकार आहे. मात्र त्याचवेळी या पक्षांकडून त्या आश्‍वासनांची पूर्तता कशी केली जाणार हे जाणून घेण्याचा मतदारांनाही अधिकार आहे.

दरम्यान, राजीव कुमार यांनी यावेळी संस्थांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले. निवडणुकीच्या काळातील रोख रकमेची वाहतूक तसेच विविध वस्तूंचे केले जाणारे मोफत वितरण यावर खास लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. ते म्हणालै की तामिळनाडूत एका टप्प्यात निवडणूक घेतली जावी अशी मागणी या राज्यातील बहुतेक पक्षांनी केली आहे. त्याचा विचार केला जाईल. 

निवडणुकीतील आर्थिक व्यवहारांच्या संदर्भात आयोग अत्यंत गंभीर असून आम्हाला भ्रष्टाचारमुक्त निवडणुका हव्या आहेत असे सगळ्याच जिल्हाधिकाऱ्यांना आणि संस्थांना आयोगाकडून सांगण्यात आले आहे.निवडणुका स्वतंत्र, पारदर्शी आणि मुक्त वातावरणात पार पडायला हव्या. निवडणूक प्रलोभन मुक्त असावी या आमच्या भूमिकेचा अर्थ पैशाचा दुरूपयोग खपवून घेतला जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

केंद्रांवरील व्यवस्थापन पीडब्लूडीचे कर्मचारी, महिला आणि काही ठिकाणी युवकांकडून केले जाणार आहे. त्यांना सशक्त करणे हा यामागचा उद्देश आहे.सर्व मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, वीज, शौचालय आणि व्हीलचेअर यासारख्या किमान सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असेही राजीव कुमार यांनी नमूद केले.