Sangli Samachar

The Janshakti News

राज्यसभा निवडणुकीत ठाकरे, शरद पवार गटाच्या आमदारांचे मतदान कुणाला? कुणाचा व्हीप चालणार ?

 


सांगली समाचार - दि. १५|०२|२०२४

हाविकास आघाडीतील कॉंग्रेसने एक उमेदवार दिला आहे. अशा परीस्थितीत भाजपने आणखी एक उमदेवार दिल्यास या निवडणुकीत लढत होण्याची चिन्हे आहेत. भाजपने अशोक चव्हाण, मेधा गाडगीळ आणि डॉ.अजित गोपचडे, शिवसेनेचे (शिंदे गट) मिलिंद देवरा, अजितदादा गटाचे प्रफुल्ल पटेल आणि कॉंग्रेसचे चंद्रकांत हंडोरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना राज्यसभेची संधी दिली नाही. मिळालेल्या माहितीनुसार भाजपने चार जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. पण, पक्षाने तीन उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यामुळे मोदी सरकारमध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री म्हणून कार्यरत असलेले 71 वर्षीय राणे यांना आगामी लोकसभा निवडणूक रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून लढवण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे काँग्रेसने माजी मंत्री आणि दलित नेते चंद्रकांत हंडोरे यांना निवडणुकीसाठी उमेदवारी दिली. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी जून 2022 च्या द्वैवार्षिक निवडणुकीत त्यांच्याच पक्षाच्या सदस्यांनी क्रॉस व्होटिंग केल्यामुळे त्यांचा पराभव झाला होता. तर यावेळी अशोक चव्हाण यांनी पक्ष बदलला आहे. त्यांच्यासोबत केवळ अमर राजूरकर हे आमदार भाजपमध्ये गेले आहेत. तर अन्य 11 आमदार त्यांच्यासोबत असल्याचे बोलले जात आहे.



याशिवाय कॉंग्रेसचे बाबा सिद्दिकी यांनी अजितदादा गटात परवश केला. त्याचे पुत्र ईशान सिद्दिकी हे कॉंग्रेसचे मदार असले तरी त्याचे मतदान हे सत्ताधारी पक्षालाच होईल. त्यामुळे भाजपने आणखी एक उमेदवार जरी या निवडणुकीत उतरविला तरी हंडोरे यांना ते जड जाणार आहे.

भाजपचा आणखी एक उमेदवार देणार का यावर भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, सत्ताधारी आघाडी काँग्रेस उमेदवाराचा पराभव करण्यासाठी चौथा उमेदवार उभा करण्याच्या साधक-बाधक गोष्टींचा विचार करत आहे. परंतु, काँग्रेसने दलित नेत्याला उमेदवारी दिली आहे. अशावेळी चौथा उमेदवार उभा करून हंडोरे यांना पराभूत करण्याचा प्रयत्न करायचा की नाही यावर आम्ही विचार करत आहोत. हे राजकीयदृष्ट्या योग्य ठरणार नाही. मात्र, बुधवार रात्री उशिरा यावर निर्णय अपेक्षित आहे असे सांगितले.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी 27 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. सध्याच्या 284 आमदारांच्या संख्येसह राज्यसभेची जागा जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला 41 मतांचा कोटा आवश्यक आहे. या मतांचा कोटा लक्ष घेता भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे पाच उमेदवार सहज निवडून येऊ शकतात.

कॉंग्रेसकडे ४४ आमदारांचे संख्याबळ आहे. मात्र, अशोक चव्हाण, अमर राजूरकर आणि ईशान सिद्दिकी यांची मते सोडल्यास 41 इतकी मते आहेत. शिवाय ठाकरे गटाची 15 आणि शरद पवार गटाची १५ अशी एकूण 30 जादा मतांची कुमकही हंडोरे यांच्याकडे आहे. जर भाजपने आणखी चौथा उमेदवार दिला तर ही मते अबाधित ठेवण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांना आपल्या आमदारांना व्हीप बजावावा लागेल.

अशोक चव्हाण हे कॉंग्रेसची काही मते फोडतील असा अंदाज आहे. ठाकरे गटाला विधानसभा अध्यक्षांनी दुसरा गट म्हणून मान्यता दिली आहे. तर, निवडणूक आयोगाने नुकताच राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजितदादा गटाकडे दिले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांना कुणाचा व्हीप लागू होणार हा प्रश्न आहे.