Sangli Samachar

The Janshakti News

न केलेल्या कामाचे श्रेय विरोधकांनी घेऊ नये वैभव शिंदेसांगली समाचार - दि. १५|०२|२०२४

आष्टा - १९९६ पासून आष्टा शहर विकास आघाडीच्या माध्यमातून आष्टा शहरांमध्ये शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. शहराचा चेहरा मोहरा बदललेला आहे. आ. जयंतराव पाटील साहेब, स्व. विलासराव शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विकासकामे पूर्ण झाली आहेत. सध्या शहरांमध्ये सुरू असलेली विविध विकास कामे, विकास आघाडीने मंजूर करून घेतलेली आहेत. त्या कामाच्या श्रेय विरोधकांनीघेऊ नये.

मंजूर न केलेल्या कामाचे श्रेय घेऊन विरोधक जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप अष्टाचार विकास आघाडीचे नेते वैभव दादा शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी आष्टा शहर विकास आघाडीचे नेते झुंजारराव शिंदे, माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील, साखर कारखान्याचे संचालक रघुनाथराव जाधव, दूध संघाचे संचालक संग्राम फडतरे, माजी नगरसेवक धैर्यशील शिंदे, सतीश माळी, वरदराज शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


वैभव शिंदे यावेळी बोलताना पुढे म्हणाले की, आष्टा नगर परिषदेमध्ये आष्टा शहर विकास आघाडीची सत्ता असताना २०१७ ते २०२१ सालामध्ये विविध विकास कामाचे प्रस्ताव व ठराव झाले आहेत. यामध्ये मटन मार्केट, सभागृह फर्निचर, शॉपिंग सेंटर बांधणे, गांधीनगर येथे दहा हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी भरणे, इत्यादी कामे ठराव घेऊन ९० टक्के विविध विकास कामे पूर्ण झाली आहेत. अजूनही ही विकास कामे सुरूच आहेत, ती पुढे सुरू राहतील. आपण पदयात्रेच्या माध्यमातून शहरातील समस्या जाणून घेत आहोत. सध्या शहरांमध्ये विकास कामे पूर्ण झाले आहेत व जी काही सुरू आहेत, ती कामे आष्टा शहर विकास आघाडीने मंजूर केली आहेत हे लोकांना ठाऊक आहे. त्यामुळे विरोधकानी नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही हे लक्षात ठेवावे.

 यावेळी बोलताना झुंजारराव पाटील म्हणाले की आष्टा शहर विकास आघाडीने पाठपुरावा करून आणलेल्या नगर परिषदेच्या विविध विकास कामाचा शुभारंभ गुरुवार दिनांक 15 रोजी संध्याकाळी सहा वाजता मटण मार्केट आष्टा येथे आयोजित केलेले आहे. नागरिकांनी यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ही त्यांनी केले.