सांगली समाचार - दि. २४|०२|२०२४
सांगली - सांगली लोकसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षांत मोठी विकासकामे झाली आहेत. सिंचन, रेल्वे, रस्ते यासह अन्य कामांसाठी केंद्र सरकारने हजारो कोटींचा निधी जिल्ह्याला दिला. त्यामुळे सांगलीत भाजपचा विजय निश्चित आहे. पक्ष जो उमेदवार ठरवेल, त्याच्या पाठीशी कार्यकर्त्यांनी उभे राहावे, असे आवाहन खासदार संजयकाका पाटील यांनी केले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीत भाजपचा कार्यकर्ता संवाद मेळावा मध्य प्रदेशचे ग्रामविकासमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांच्या उपस्थितीत पार पडला. या वेळी खासदार संजयकाका पाटील यांनी केलेल्या कामांचा पाढा मंत्री पटेल यांच्यापुढे वाचून दाखविला. निवडणूक तोंडावर आली आहे. मात्र, अद्याप उमेदवारीचा घोळ मिटलेला नाही. भाजपमध्ये विद्यमान खासदार पाटील यांच्याबरोबर माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनीही उमेदवारीवर दावा केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, खासदारांनी यंदाही भाजपचाच विजय निश्चित असल्याचे सांगितले. पक्षाने अद्याप उमेदवार ठरविला नाही, परंतु पक्ष देईल त्याच्या पाठीशी उभे राहावे लागेल, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सूचित केले.
मंत्री पटेल म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने 370 कलम हटवले, राम मदिंराचे निर्माण केले. देशात काँग्रेसने त्यांच्या 60 वर्षांच्या कारकिर्दीत केला नसेल त्यापेक्षा जास्त विकास गेल्या दहा वर्षांत केला. हे करताना भाजपने मोंदीच्या नेतृत्वाखाली विकासासोबत देशाचा समृद्ध वारसाही जपून पुढे नेण्याचे काम केले. काँग्रेस मात्र त्यांच्या काळात हा वारसा मोडीत काढण्याचे काम केले.
'मतभेद बाजूला ठेवा'
2014 व 2019 मध्ये 35 ते 40 टक्के मते मिळली आहे. आता 2024 मध्ये 51 टक्के पेक्षा जास्त मते मिळाली पाहिजे. यासाठी अजूनही 11 ते 12 टक्के मतांची तूट आहे. ती भरून काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी आपले मतभेद, इगो बाजूला ठेवून कामाला लागा, अशा सूचना माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केल्या.
निवडणुकीपूर्वी बेस्ट होणार
सांगली मतदारसंघातील पुढचा खासदार भाजपचा असेल. जिल्ह्यात पक्षाकडून निवडणुकीची तयारी केली जात आहे. परंतु उमेदवारीचा निर्णय पक्षाकडून घेतला जाईल. पक्ष देईल, तो उमेदवार सर्वांना मान्य असेल. मतदारसंघात आम्ही सध्या बेटर आहोत. निवडणुकीपूर्वी बेस्ट होऊ, असा दावा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केला.