Sangli Samachar

The Janshakti News

मराठा आरक्षणाचा गुलाल उधळला! पण विजयोत्सवात अजितदादा कुठ आहेत ?

 

सांगली समाचार  - दि. २४|०२|२०२४

मुंबई  - विशेष अधिवेशनात मराठा समाजाला SEBC प्रवर्गातून स्वतंत्र 10 टक्के आरक्षण जाहीर होताच महायुती सरकारनं विधीमंडळ आवारातच या विजयाचा गुलालही उधळला... पण या विजयोत्सवात अजित पवार आणि त्यांचा पक्ष मात्र कुठेच दिसला नाही. त्यामुळं मराठा आरक्षण प्रश्नापासून अजित पवार स्वत: अलिप्त तर ठेऊ पाहात नाहीत ना? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जाऊ लागला.

राष्ट्रवादी विजयोत्सवापासून अलिप्त का?

20 फेब्रुवारीच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला 10 टक्के आरक्षणाचे विधेयक एकमतानं मंजूर होताच महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयाचा गुलाल उधळला. पण महायुतीच्या या जल्लोषात अजित पवार मात्र कुठेच दिसले नाहीत. नाही म्हणायला त्यांनी घाईगडबडीनं विधानभवनाबाहेर पडताना एक बाईट दिला. पण विजयोत्सवाला ते काही थांबलेच नाहीच.

अजित पवारांच्या या अनुपस्थितीबद्दल फडणवीसांची सारवासारव

खरंतर मराठा आरक्षणाचा एवढा मोठा निर्णय झालाय म्हटल्यावर नाही अजित दादा तर किमान त्यांच्या पक्षाने तरी जल्लोष करणं अपेक्षित होतं. पण कुठंही तसं झालं नाही. त्यामुळं मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून महायुती आणि अजित पवार यांच्यात काही अणबण तर नव्हती ना? अशा चर्चा सुरू झालीय.


तसं पाहिलं तर राष्ट्रवादी हा प्रारंभी मराठ्यांचा राजकीय पक्ष मानला जायचा आणि काही प्रमाणात त्यात तथ्यही होतं. पण पक्ष फुटीनंतर भुजबळ, तटकरे, मुंडे हे ओबीसी नेते अजित पवारांसोबत गेले. त्यामुळंच मराठा आरक्षणावरून अजित पवारांना थेट मराठा समाजाच्या बाजुनं भूमिका घेता येत नव्हती. अशातच भुजबळांनी ओबीसी मेळावे सुरू केल्यानं अजित पवारांना मराठा आंदोलक जाहिरपणे प्रश्न विचारू लागलेले. बारामतीत तर याच मराठा आंदोलकांनी अजितदादांना माळेगाव साखर कारखान्यात शुभारंभांची मोळी देखील टाकू दिली नव्हती. तेव्हापासूनच अजित पवार जरांगेंना अप्रत्यक्षपणे वाचाळवीर म्हणून बोलायचे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जाहिरपणे जरांगे यांच्या व्यासपीठावर जाताना दिसलेत.

यामुळेच आरक्षण जाहीर होताच मुख्यमत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांनी एकत्रित गुलालाची उधळण केली. कारण आरक्षण दिल्याचं श्रेय मुख्यमंत्र्यांना तर ओबीसी आरक्षण वाचवल्याचं श्रेय हे फडणवीसांना मिळाल्याचं बोललं जाऊ लागलंय. पण, अजित पवार मात्र याच मराठा आंदोलनाच्या फ्रेममध्ये ऑड मॅन आऊट बनून गेल्याचं बोललं जातंय. याउलट शरद पवार हे आता सत्तेच्या विरोधात असल्यानं हेच मराठा आंदोलन त्यांना फायदेशीर ठरताना दिसतंय. कदाचित म्हणूनच अजित पवारांनी या विजयोत्सवापासून स्वतःला अलिप्त ठेवल्याचं बोललं जातंय.